नंदुरबार – नव्याने स्थापन होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांना कॅबिनेट दर्जाची महत्त्वाची जबाबदारी निश्चित झाल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तथापि याविषयीचा खरा उलगडा आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी रात्री 7 वाजे दरम्यान मुंबई येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडूनच केला जाऊ शकतो. यामुळे खरी स्थिती कळण्यासाठी भाजपा चाहत्यांना आणखी काही तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मंत्रिमंडळात कोणाचा समावेश असेल याबद्दलची स्पष्टता भारतीय जनता पार्टी कडून कुठेही अधिकृतपणे करण्यात आलेली नाही. संभाव्य मंत्रीपदाच्या यादीत काही नावे घेतली जात असल्यामुळे त्यावर आधारित वेगवेगळ्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. धुळे जिल्ह्यातील आमदार जयकुमार रावल, आमदार मंजुळाताई गावित, नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, आमदार आमच्या पाडवी यांच्या नावाचा यात समावेश आहे.
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय गणित लक्षात घेता कॅबिनेट दर्जाचे पद धुळे जिल्ह्याच्या वाटेला गेल्यास नंदुरबारला मिळणे कठीण जाईल, हा अंदाज असल्यामुळे संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष ज्येष्ठ नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे वेधले गेले आहे. खास करून आदिवासी विकास खाते कोणाला दिले जाते याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आदिवासी विकास खाते अजितदादा गटाकडे जाणार असा होरा जाणकारांनी काही दिवसांपूर्वी मांडला होता परंतु आदिवासी विकास विभाग भारतीय जनता पार्टीकडेच राहणार असे आता सांगण्यात येत आहे. परिणामी डॉक्टर विजयकुमार गावित यांनाच पुन्हा ही जबाबदारी दिली जाईल का? हा मोठा उत्सुकतेचा विषय बनला आहे.
दरम्यान, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील मंत्री पदासाठी इच्छुक असलेल्यांपैकी डॉक्टर विजयकुमार गावित यांचे पारडे जड असल्याचा दावा करण्यात येतो. हा दावा करणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री मंडळात पूर्वीपासून आदिवासी समूहाच्या मतांना समोर ठेवून डॉक्टर विजयकुमार गावित यांना स्थान मिळत आले हे वास्तव आहेच; तथापि प्रदीर्घ अनुभव, समूहांना संघटित ठेवण्याचे कसब, प्रत्यक्ष लोकांपर्यंत लाभ योजना पोहोचवण्याची क्षमता आणि लोकनिष्ठेने रचलेले ऐतिहासिक कार्य यामुळेही पक्षात त्यांचे पारडे निश्चितच जड राहिले आहे. त्यांच्या कारकिर्दीची ही बाजू काय जादू घडवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शासकीय योजना असो की पक्षीय कार्यक्रम असो प्रामाणिकपणे राबवणे, महायुती मधील हितशत्रूंनी अडचणीत आणलेले असतानाही पुरेपूर संयमित राहून राजकीय भूमिका निभावणे, आरक्षण आणि पेसा कायदा सारख्या नाजूक विषयांवर महायुतीची भूमिका आदिवासी समूहांमध्ये प्रभावीपणे ठसवणे अशा अनेक अंगाने उजवे असलेले डॉक्टर विजयकुमार गावित यांचे कार्य वरिष्ठ स्तरावर विचारात घेतले जाणे डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या चाहत्यांना जास्त अपेक्षित आहे. मध्य प्रदेश आणि गुजरात सीमेवरील धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील समूहांचा आणि विकासाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून देखील फडणवीस सरकारसाठी सध्याची ती राजकीय गरज राहिल. कल्पकतेने आणि लोकनिष्ठा कायम ठेवून कायम करणारा प्रभावी नेता मंत्री पदाचा निश्चितच हकदार असतो आणि या सर्व संदर्भानेच डॉक्टर विजयकुमार गावित यांना मंत्रिपद मिळणे क्रमप्राप्तच आहे; हे एकंदरीत ठळकपणे निदर्शनास येते.
ही सर्व बाजू लक्षात घेऊनच डॉक्टर विजयकुमार गावित यांना मंत्रिमंडळातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यासाठी जे.पी. नड्डा, अमित शहा यांच्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत भारतीय जनता पार्टीतील सर्व वरिष्ठ नेते अनुकूल असल्याचे म्हटले जात आहे. परिणामी डॉक्टर विजयकुमार गावित यांना कॅबिनेट मंत्रीपद निश्चित असल्याचे संकेत राजकीय सूत्रांकडून दिले जात आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या मंजुळा गावीत यांना स्थान दिले जाते की जयकुमार रावल यांची पुन्हा वर्णी लागते याचाही उलगडा आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी रात्रीपर्यंत होणार असे राजकीय सूत्रांचे म्हणणे आहे.