महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांचे फेरबदल नुकतेच घोषित केले असून त्यानुसार महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे आता भंडारा जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणार आहेत, तर अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुनर्वसन व मदत मंत्री अनिल भाईदास पाटील हे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री राहणार आहेत. आदिवासी विकास खाते आणि पालकमंत्री पद याचा प्रभावी वापर करून गेल्या वर्षभरात डॉक्टर विजयकुमार गावित यांनी विकास कामांचा जो तडाखा लावला होता त्याला खीळ बसवणारी ही घटना आहे. त्यामुळेच नंदुरबार जिल्ह्यातील गावित समर्थक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतप्त भावना उमटत आहेत.
मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित परिवाराला सातत्याने मिळत असलेले राजकीय यश आणि वाढता जनपाठिंबा ज्यांना पाहवला नाही, अशा त्यांच्या विरोधकांची जळगाव आणि धुळ्यापासून नंदुरबार पर्यंत एक साखळी जोडली गेली आहे. त्यांनीच मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या पालकमंत्री पदाला धक्का लावला; अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तुळात आहे. पालकमंत्री पदाचे फेरबदल असे परिणाम घडवत असतानाच आता महामंडळ वाटपाचा आणि त्यावरील पदांच्या नियुक्तीचा राजकीय राडा पुढे आणखी रंगण्याची शक्यता आहे.
भाजपाने मोठा भाऊ बनून राष्ट्रवादीसाठी पालकमंत्री पदांचा त्याग केला, असे अलंकारिक शब्दात सांगितले जाते. अजितदादा गटाला अनुषंगून सत्तापदांचा समतोल साधण्याची गरज म्हणून हे फेरबदल घडवले गेले; असे स्पष्टीकरण भाजपाच्या वरिष्ठांकडून माध्यमांसमोर दिले जात आहे. परंतु, नंदुरबार जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी दिवस रात्र एक करणारे मंत्री डॉक्टर गावित यांनी आणि या कार्यावर अवलंबून असलेल्या नंदुरबार भाजपाने या त्यागाची किंमत का मोजावी? हा नंदुरबार जिल्ह्यातील गावित समर्थक भाजपा कार्यकर्त्यांना पडलेला प्रश्न आहे. पालकमंत्रीच्या स्वरुपात मंत्री अनिल भाईदास पाटील यांना नंदुरबार जिल्ह्यात एन्ट्री देऊन भाजपाचे वरिष्ठ नेमके काय साध्य करू पाहताहेत ? हा प्रश्न जिल्हाभरातून उपस्थित केला जातो आहे. हे फेरबदल पुढे जाऊन जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलवायला कारणीभूत ठरतील, अशी भीती काही कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. परंतु स्वतः डॉक्टर गावित यांनी तसले कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. भंडारा जिल्ह्यात भाजपा कमकुवत असल्यामुळे त्याच्या सशक्तिकरणासाठी मला तिकडची जबाबदारी दिली, असे मंत्री गावित म्हणाले. वरिष्ठांनी केलेले निर्णय स्विकारायचे असतात आणि म्हणून भंडारा जिल्ह्याचे पालकत्व तेवढ्याच जबाबदारीने निभवायला मी तत्पर आहे, अशी सौम्य प्रतिक्रिया मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी माध्यमांसमोर दिली.
कार्यकर्त्यांचा रोष नव्या पालकमंत्र्यांवर
नव्हे; भाजपाच्या वरिष्ठांवरच अधिक
पालकमंत्री अनिल पाटील यांच्या नावाची नुसती घोषणा झाली. अद्याप त्यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या कामकाजात लक्ष घालायला सुरुवात करणे बाकी आहे. त्याच्या आधीच नंदुरबार जिल्हा भाजपातील गावित समर्थकांकडून त्यांच्याविषयी साशंकता व्यक्त केली जाणे, हे जरा घाईचे वाटत आहे. नवे पालकमंत्री गावित गटाच्या विरोधातील आहेत अशी भावना आधीच बनणे चूक ठरू शकते. तथापि नवे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या विषयी भाजपातील कार्यकर्ते साशंक असण्याला एक पार्श्वभूमी आहे. भारतीय जनता पार्टीत मंत्री गिरीश महाजन यांच्यानंतर खानदेशातून मंत्रिपदासाठी विचारात घेतले जाणारे डॉक्टर विजयकुमार गावित एकमेव आहेत. त्यांच्यामुळे जळगाव आणि धुळ्यातील काही जणांना कात्री लागते. म्हणून डॉक्टर गावित यांना वरिष्ठ स्तरावर धक्का लावण्याचे तंत्र पक्षातूनच घडत असल्याची चर्चा पूर्वीपासून आहे. गावित परिवाराच्या धावत्या विजय रथाला मोगरी लावण्याचे काम करणाऱ्या तसल्या नेत्यांनीच पालकमंत्री पदाचे फेरबदल घडत असताना नंदुरबारचा क्रम लावला अशीही वदंता आहे. परिणामी नवे पालकमंत्री अनिल पाटील हे त्या गोतावळ्यातून आल्याची भावना येथील कार्यकर्त्यांची बनली आहे. अशातच डॉक्टर गावित गटाशी तीस वर्षापासून राजकीय संघर्ष करणारे शिंदे गटाचे जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटाने मंत्री अनिल पाटील यांना पालकमंत्री पद मिळाल्याच्या आनंदात प्रचंड आतशबाजी केली. शहादा तळोदा विधानसभेचे भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांनी सुद्धा उघडपणे मंत्री अनिल पाटील यांचे जाहीर अभिनंदन केले. सध्या डॉक्टर गावित यांना दुखावणारी भूमिका राजेश पाडवी घेत असतात. आपल्या पक्षाच्या हातून पालकमंत्री पद गेल्याचा आनंद भाजपाच्या या आमदार महोदयांनी का मनवला? हा प्रश्न उपस्थित केला गेला. एकंदरीतच स्वपक्षीय आणि विरोधी पक्षातील विरोधकांना नवे पालकमंत्री बळ देऊन नंदुरबार जिल्ह्यातील समीकरण बदलवतील, ही भाजपाच्या गाव पातळीवरील कार्यकर्त्यांना वाटणारी साशंकता असल्या घटनाक्रमामुळे ठळक बनते. असे असले तरी भारतीय जनता पार्टीतील प्रत्येक कार्यकर्त्याचा रोष सध्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांवर आहे. नुकतीच जिल्हा कार्यकारिणीची रचना झाली तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या उभारणीसाठी योगदान देणारे अनेक जण दुखावले गेले आहेत पक्षातून अनेक जणांचा पत्ता कट होत असल्याची भावना बनली आहे आणि अशा पालकमंत्री फेरबदलाची घटना भाजपातील नाराजीचा स्फोट करणारी ठरू शकते. याला भाजपातील वरिष्ठ कारणीभूत मानले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यापासून अमित शहा यांच्यापर्यंत याविषयीच्या तक्रारी पोचल्या असल्याचे समजते. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकवून देणारा हुकमी एक्का म्हणून ज्या डॉक्टर गावित यांच्याकडे पाहिले जाते त्यांना सुरक्षित करणारी भूमिका घेण्याऐवजी पक्षाचे वरिष्ठ अचंबित करणारे अचाट निर्णय कसे काय घेऊ शकतात? हा प्रश्न त्यांच्या मनाला छळत आहे.
अमळनेरच्या राजकारणाचा संदर्भ
नवे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या नंदुरबार एन्ट्री ला खरंतर अमळनेर विधानसभा मतदारसंघातील राजकारणाचे अधिक संदर्भ असू शकतात. नंदुरबार येथून थेट अमळनेर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी करीत 2014 च्या निवडणूक प्रसंगी याच अनिल भाईदास पाटील यांचा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पराभव केला होता. त्यातूनच अमळनेरचे पाटील आणि नंदुरबार येथील चौधरी परिवार यांच्यातील राजकीय संघर्ष रंगला होता. आज संपूर्ण चित्र पालटले आहे. तत्कालीन ते राजकीय संघर्ष आज तेवढे तीव्र राहिलेले नाही. परंतु चौधरी गटाचे नंदुरबार नगरपरिषद निवडणूक जिंकण्याचे ईरादे असून त्या खेळात चौधरी यांच्या विरोधकांची बाजू घेताना नवे पालकमंत्री दिसले, तर नंदुरबार वासीयांना आश्चर्य वाटणार नाही.