नंदुरबार – आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच अस्तंबा शिखर परिसरात रस्ते,पुल आणि पायऱ्यांची बांधणी होत असून त्यांनी आदिवासी विकास विभागातून मंजुरी दिलेल्या जवळपास 50 कोटी रुपयांच्या कामांचे आज दिनांक 11 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांचे हस्ते भूमिपूजन होत आहे.
ना. डॉ. श्री. विजयकुमार गावित मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र यांच्या विशेष प्रयत्नाने आदिवासी विकास विभागाकडून मंजूर ४५ कोटी रुपये खर्चाच्या बिलगाव ते सावऱ्यादिगर रस्त्याचे बांधकाम करणे, उदई नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, बोधी नाल्यावर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे, तसेच २ कोटी २० लाख रुपये खर्चाच्या उगल कुंड (अस्तंबा) ते अस्तंबाशिखर ता. धडगाव रस्त्याची सुधारणा करणे, १ कोटी २५ लाख रुपये खर्चाच्या अस्तंबा शिखर परिसरातील रस्त्याची सुधारणा करणे या कामांचे भूमिपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते दि. ११ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी खासदार हिनाताई गावित, जिल्हापरिषद अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित हे उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमात तालुक्यातील भाजपाचे सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपचे तालुक्याचे सुभाष पावरा यांनी केले आहे.
स्थानिक ग्रामस्थांची प्रतिक्रिया
धडगाव भागातून सलग 35 वर्षे निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी काय केले? असा प्रश्न करीत स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की, साव-यादिगर उदय नदीवरील पुलाचे काम सन 2007 पासून म्हणजे 17 वर्ष झाले अपूर्ण स्थितीत रखडलेले आहे. यामुळे नर्मदा काठावरील नागरिकांचा पैसा व वेळ दोन्ही खर्च होतात. पुलाचे अपूर्ण काम सुरू व्हावे यासाठी स्थानिक आदिवासी संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली. परंतु या रखडलेल्या पुलासाठी निधी आणण्यात धडगावच्या लोकप्रतिनिधींचे प्रयत्न अपुरे पडले. नर्मदा काठावरील नागरिकांना पायीपीट करून बिलगाव पर्यंत यावे लागते आणि बिलगावहून खाजगी वाहन किंवा एस.टी.बसने तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या या भागातील आदिवासी बांधव मुख्य प्रवाहात यावे यासाठी अखेर आदिवासी विकास मंत्री नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी न्याय दिला आणि या पुलाचे काम मार्गी लावले आहे. नर्मदा काठावरील जवळ जवळ पंधरा ते वीस गावांना याचा लाभ होणार आहे.
अस्तंबा भक्तांना गावितांनी दिला न्याय
सातपुडा रांगेत धडगाव तालुक्यातील सर्वात उंच शिखर म्हणून अस्तंबा ऋषींचे शिखर आहे. दिवाळीच्या धनत्रयोदशी पासून अस्तंबा यात्रेसाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यातून भाविक हजारोच्या संख्येने येतात. या भाविकांना आपली यात्रा सुलभ व सोयीस्कर व्हावी. म्हणून डॉ.विजयकुमार गावीत यांनी पहिल्यांदाच या शिखरावर भाविकांना जाण्यासाठी रस्ता व पाय-या करणेकामी आदिवासी विकास विभागामार्फत २ कोटी २० लक्ष रूपये मंजूर केले आहेत. आणि वरील दोन्ही कामांचे भूमिपूजन दि. ११ ऑक्टोबर रोजी डॉ. विजयकुमार गावीत यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यानंतर प्रथमच येथील दुर्गम भागात असे मोठे विकास काम होत आहे, असा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला.