नंदुरबार (योगेंद्र जोशी) – महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे जिल्हा नेते डॉक्टर विजयकुमार गावित आणि शहादा तळोदा विधानसभा मतदार संघातील भाजपचे आमदार राजेश पाडवी काल चक्क एका सत्कार सोहळ्याला व्यासपीठावर एकत्र आले. शिवाय त्या प्रसंगी भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांनी ‘एकत्र काम करूया’ अशी साद घातल्यावर “आपल्याकडून चुका होणार नाही याची काळजी घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र काम करू या” अशा शब्दात मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रतिसाद दिला. ते पाहून हजारोच्या संख्येने उपस्थित शेतकरी सभासदांना सुखद धक्का बसला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून त्यांनी या वक्तव्यांना दाद देखील दिली. या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून निर्माण झालेला दुरावा संपल्याची व त्यांच्यात दिलजमाई झाल्याची जोरदार चर्चा त्यामुळे सर्वत्र सुरू झाली.
शहादा तालुक्यातील लोकनेते जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणीची निवडणूक नुकतीच पार पडली आणि या निवडणुकीत दीपक बापू पाटील यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. त्या सर्व संचालकांचा सत्कार सोहळा महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे जिल्हा नेते डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आणि भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थिती काल दिनांक 3 मार्च 2024 रोजी रात्री आठ वाजता लोणखेडा येथे पार पडला. त्या सत्कार सोहळ्याप्रसंगी हे सर्व घडले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, तळोदा शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा सूतगिरणीतील विजयी पॅनलचे नेते दीपक बापू पाटील, साने गुरुजी शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मकरंद पाटील, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतिलाल टाटीया, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, माधवभाई पाटील, भाजपाचे ईश्वर भूता पाटील, चौधरी आणि सूतगिरणीचे नवनिर्वाचित संचालक तसेच सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अडीच महिन्यापूर्वी शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली तेव्हा भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांनी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे विरोधक म्हटले जाणाऱ्या गटाचा समावेश असलेल्या पॅनल चा पुढाकार घेतला होता. तथापि मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अलिप्त भूमिका घेतली परिणामी शहादा कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधकांच्या ताब्यात गेली. आमदार राजेश पाडवी यांच्या प्रयत्नांना अपयश आले. त्याच दरम्यान, दीपक बापू यांचे पारंपारिक विरोधक अभिजीत पाटील यांनी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित परिवाराला लक्ष बनवणारा फोरम स्थापन केला. त्याप्रसंगातही आमदार राजेश पाडवी हे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विरोधकांच्या बाजूने उभे राहिलेले दिसले. परंतु आता सहकारी सूतगिरणीची निवडणूक पार पडली तेव्हा दीपक बापू यांचे पारंपारिक विरोधक अभिजीत पाटील यांनी उभे केलेल्या पॅनल पासून भाजपाचे आमदार राजेश पाडवी अलिप्त राहिले आणि मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांची साथ लाभलेल्या दीपक बापू पाटील यांच्या पॅनलच्या सोबत राहिले. परिणामी हे पॅनल पूर्णतः विजयी झाले. याच घटनाक्रमाचा संदर्भ ठेवून आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या भाषणात मंत्री डॉक्टर गावित सोबत असले की विजय प्राप्त होतो अशा अर्थाचे प्रतिपादन केले जे उपस्थितांना सुखद धक्का देऊन गेले.
प्रारंभी दीपक पाटील यांनी सर्व उपस्थित शेतकरी सभासदांना संबोधित केले. सूतगिरणी अडचणीत असतानाही सभासदांनी विश्वास व्यक्त करीत पूर्ण पॅनलला भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवून दिला याबद्दल त्यांनी आभार मानले तथापि निर्माण झालेल्या निवडणूक संघर्षाच्या प्रसंगात ऐनवेळी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मोलाची साथ दिल्याने तसेच आमदार राजेश पाडवी यांनी दिलेल्या सहकार्या मुळे विजय प्राप्त करणे सोपे झाले हे सांगताना दीपक बापू पाटील यांचे मन गहिवरुन आले. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन करून सूतगिरणीने आता कापड निर्मितीचे नवे दालन विकसित करावे त्यासाठी लागेल ते सहकार्य जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या माध्यमातून मिळवून देऊ असे भरीव आश्वासन दिले.
आमदार राजेश पाडवी काय म्हणाले..?
तर आमदार राजेश पाडवी यांनी निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचे आपण कसे प्रयत्न केले, हे विशद करीत सभासदांनी दाखवलेल्या संघटन शक्तीचे कौतुक केले. ते पुढे म्हणाले की, एकीकडे आम्ही निवडणूक बिनविरोध कशी होईल आपल्यातला सिमेंट कसा राहील याचा प्रयत्न करत होतो परंतु दुसऱ्या बाजूने तुमचा पाटा पाडला जाईल अशा शब्दातून निरोप येत होते. परंतु मारणाऱ्या पेक्षा वाचवणारा मोठा असतो आणि हरवणाऱ्यापेक्षा जिंकवून देणारा मोठा असतो यावर आमचा विश्वास आहे; असे नमूद केले. तसेच “या सहकारी सूतगिरणीच्या निवडणुकीत मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित सोबत असल्यामुळे विजय प्राप्त झाला. याच्या आधी पार पडलेल्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ते सोबत राहिले असते तर, त्याही निवडणुकीत आपण विजय मिळवला असता”; असा आशय असलेले भाषण करून या प्रसंगी आमदार राजेश पाडवी यांनी ‘आपण आता सोबत चालू या’ असे जाहीरपणे सांगितले. यामुळे सभेच्या ठिकाणी मंत्री गावित आणि आमदार पाडवी यांच्यात समेट घडल्या विषयीचा आनंद व्यक्त करणारी कुजबुज सुरू झालेली दिसली.
दरम्यान, मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तोच कृषी उत्पन्न बाजार समिती गमावल्याचा संदर्भ अप्रत्यक्षपणे पकडला आणि आपल्या भाषणात म्हणाले की, काही वेळेला काय असतं काही चुका होत असतात. त्या तसल्या चुका आमच्या सर्वांकडून झाल्या. पुढे त्या होणार नाही याची काळजी घेऊ. आम्हाला पण थोडाफार चटका लागण्याची गरजच होतीच.. कारण चटका बसल्याशिवाय जाणीव येत नाही.. त्यासाठी तसला एक चटका भरपूर झाला. काही वेळेला पाऊल वाकडं तिकडं पडलं तर त्रास होतो. त्याच्यामुळे कुठेतरी संकट येतात. त्या संकटांमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला सहकार्य करावे लागेल. कारण आपण सर्वांनी उभी केलेली ही संस्था आहे. परंतु त्या संकटाला घाबरून जाऊन आपण जर वाकडं तिकडं पळायला लागलो तर त्यातून मोठं नुकसान होतं. त्यातून सावरण्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये संघटितपणाने रहावे लागेल. जिल्ह्याच्या विकासात अडथळे आणणारे नुकसान टाळण्यासाठी आपण सर्व एकत्र राहू या. उभं करूया.. मंत्री गावित यांनी असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट करून त्यांनी प्रतिसाद दिला. यामुळे सत्कार सोहळा संपल्यानंतर सर्व उपस्थितांमध्ये मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि आमदार राजेश पाडवी यांच्यातील दुरावा संपून समेट घडल्याची एकच चर्चा सुरू झाली. आमदार राजेश पाडवी मात्र सत्कार सोहळा संपल्यावर स्नेहभोजनाला न थांबता निघून गेले.
गुजर समाजभवनाला पाच कोटी रुपयांचा निधी: मंत्री गावित
मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांचे सविस्तर भाषण असे: गंभीरपणाने विचार करायला लागलात त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. अण्णासाहेबांनी जे कष्ट केले ते मी स्वतः डोळ्यांनी बघितले. सातपुडा साखर कारखाना, सूतगिरणी, स्टार्च फॅक्टरी आणि अन्य सहकारी प्रकल्प त्यांनी अत्यंत कष्टाने उभे केले. कालांतराने ते सर्व अडचणीत आल्यावर कसे वाचवता येईल यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले आणि आम्ही पुरेपूर सहकार्य करायचे सर्वतोपरी प्रयत्न केले ते सुद्धा आपण बघितलं. विरुद्ध प्रवाहाने वाहणारी व्यक्ती हे उभं करू शकते हे मला वाटतं की आपल्या देशातलं पहिलं उदाहरण असेल; असे सांगून मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित पुढे म्हणाले, आता दीपक बापू आणि आपण सर्व मिळून ते सर्व चांगल्या रीतीने कसं होईल या दृष्टीने प्रयत्न करु या. या सूतगिरणीत इतक्या सुंदर चांगल्या प्रतीचा दोरा आपण वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवतो याचं कौतुक पण होत होतं. ते उच्च प्रतीचे काम, उत्तम व्यवसाय या ठिकाणी दीपक पाटील यांना आपण करताना बघितलं. परंतु यापुढे काही अडचणी आल्यास ते सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. कुठेही गरज पडेल त्या ठिकाणी पाठपुरावा घेऊ. दीपक बापू यांनी काळजी करण्याचे कारण नाही येत्या वर्षभरात कारखान्याचे प्रश्न 100% सोडवू. खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या माध्यमातून आपल्याला केंद्रामधून जी मदत लागेल ती निश्चितपणाने त्या ठिकाणी जाऊन आपल्याला शंभर टक्के मिळेल याची मला खात्री आहे त्याचबरोबर दुसरे बाकीचे प्रश्न आहेत. तुमच्या शेतीचे प्रश्न आहे तेही आम्ही सोडवू इरिगेशन निश्चितपणाने वाढवू. कारण की आम्ही तापीचे बॅकवॉटर लिफ्ट करणार असून त्याचा सर्वे झाला आहे. जिथे गरज असेल तिथे नवीन करू जिथे जुने आहे त्या जुन्या रिपेअर करू. ते सुद्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्न सरळ सोपे निश्चितपणाने होतील एवढेच या निमित्ताने मला सांगायचं आहे. आम्ही सोबत आहोत आता. काही काळजी करायचं कारण नाही ; अशा शब्दात मंत्री डॉक्टर गावित यांनी संबोधित केले आणि त्यावर टाळ्यांचा कडकडाट करून उपस्थितांनी दाद दिली. महात्मा गांधींचे अध्ययन केंद्र प्रकाशाला उभं करण्यासाठी तसेच लेवा पाटीदार गुजर समाज भवनासाठी पाच कोटी रुपये दोन-चार दिवसांमध्ये मंजूर होऊन जातील; असेही मंत्री डॉक्टर गावित यांनी सांगताच उपस्थितांनी जल्लोषात टाळ्यांचा कडकडाट केला.