नंदुरबार – मुख्यमंत्र्यांनी नवाब मलिक यांचा राजीनामा न घेतल्यास भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्यात तीव्र आंदोलन करेल व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासनाची राहील, असा ईषारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिला आहे.
अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याच्या आरोपाखाली मंत्री नवाब मलिक यांना काल अटक झाली त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करणारे पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्या पत्रकात नमूद केले आहे की, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकारातील गुन्हेगार सरदार शहावली खान व कुख्यात दाऊद इब्राहिम ची बहीण हसीना पारकरचा हस्तक मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल कडून करोडो रुपयांच्या मोक्याच्या जागेची कवडीमोल दराने खरेदी केली होती. मंत्री नवाब मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी आर्थिक संबंध असल्याचा हल्लाबोल करीत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी चार मालमत्तेची प्रकरणे ईडी कडे चौकशीसाठी दिले होते. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडेही ते पुरावे दिले होते. हे सर्व पाहता प्रकरण अतिशय गंभीर असून नवाब मलिक यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना बरखास्त करावे; अशी जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी केली आहे. नवाब मलिकांनी देशद्रोह्यांना बॉम्बस्फोटातील आरोपींना कोणते असे सहकार्य केले की, ज्यामुळे या आरोपींनी मंत्री नवाब मलिक यांना कवडीमोल किमतीत जमिनी दिल्या; याची देखील चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी यांनी केली आहे.