नंदुरबार – मध्यरात्री अचानक शहादा, नंदुरबार आणि नवापूर या तीन तालुक्यातील संशयीतांची धरपकड करीत 4 पिस्टल, 3 तलवारी व 6 जीवंत काडतूसांसह चाकू, सुरे, गुप्ती सारखे घातक शस्त्र जप्त करून नंदुरबार जिल्हा पोलिस दलाने दमदार कामगिरी केली आहे. नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनात दिवाळी दरम्यान राबवलेल्या ऑल आउट मोहिमे नंतर लगेचच केलेली ही मोठी कारवाई आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणारे आणि विकणारे यांची खबर जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना प्राप्त झाली होती. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनाही माहिती प्राप्त झाली होती व अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप अधीक्षक सचिन हिरे यांनी ते जाळे उद्ध्वस्त करण्याच्या सूचना दिल्या. तसेच यांच्या मार्गदर्शनानुसार नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा शहर व तालुका पोलीस ठाण्यांनी सतर्कता बाळगून बंदोबस्त लावला.
दरम्यान, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई वेगवेगळ्या ठिकाणी परंतु आज पहाटे दरम्यान म्हणजे 12 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्रीनंतर एकाच वेळी करण्यात आली. अवैध शस्त्र बाळगणे, मनाई आदेशाचे उल्लंघन करणे तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3/5 चे उल्लंघन यासह विविध कलमान्वये एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले. यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल नोंदीनुसार नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात विजय काशिनाथ जाधव वय 25 राहणार अभिनव कॉलनी सेंधवा तालुका बडवानी हा मध्य प्रदेशातील तरुण दि.12 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री 1 वाजे नंतर संशयित रित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्यास हटकले असता त्याच्याकडे 55 हजार रुपये किमतीचे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल व पंधराशे रुपये किमतीचे तीन जिवंत काडतूस आढळून आले. लगेच अटक करून पोलीस शिपाई योगेश पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी अधिक तपास करीत आहेत. नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे देवळफळी परिसरात जगन्नाथ प्रकाश गोंडा राहणार कालासुना पोस्ट, नोंडाज्वरी, जिल्हा गंजम हा ओडिसा राज्यातील तरुण मध्यरात्रीनंतर संशयास्पद रित्या फिरताना आढळला. त्याची झडती घेतली असता 25 हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्टल सापडले. या प्रकरणी पोलिस नायक जितेंद्र तोरवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अवैध पिस्टल बाळगणारा तिसरा आरोपी शहादा शहरातील शिरूड चौफुली वर पकडण्यात आला. सचिन दिलीप तांबोळी, वय 24, राहणार शिवाजीनगर, शहादा असे त्याचे नाव असून पोलीस शिपाई विजय ढिवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पंचवीस हजार रुपयाचे पिस्टल आणि पाचशे रुपये किमतीचे एक काडतूस त्याच्याकडे आढळल्याचे म्हटले आहे.
याचबरोबर नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात चाकू घेऊन फिरणाऱ्या नितीन धनदास कोकणी यालाही पकडण्यात आले. त्याच्यावर नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, नवापूर शहरातील देवळफळी परिसरातून राहुल संजय गावित राहणार चिंचपाडा, विसरवाडी येथून तुकाराम शंकर गावित राहणार चितवी, तालुका नवापूर तर शहादा शहरातील जुनी भाजी मंडी परिसरातून गोकुळ सुनील सोनवणे असे तीन जण धारदार तलवार बाळगताना पकडले गेले. त्यांच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याशिवाय मुकेश विजू वसावे राहणार कुणब्याफळी, चिंचपाडा याच्याकडून धारदार लोखंडी गुप्ती तर चिंचपाडा बस थांब्यावर सुरा घेऊन फिरताना भानुदास मनोज वसावे याला अटक करण्यात आली.