मुंबई – ज्या व्यक्तीला मराठी भाषेचे कुठल्याही प्रकारचे प्रेम नाही, मराठी साहित्यात कोणतेही योगदान नाही, त्यांना मराठी साहित्य संमेलनात आमंत्रित करणे अयोग्य आहे. एकीकडे मराठी साहित्यात भरीव योगदान देणारे, भाषाशुद्धीची चळवळ राबवून मराठीला समृद्ध करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मराठी साहित्य संमेलनामध्ये उपेक्षा करण्यात येते, तर दुसरीकडे हिंदी आणि उर्दु गीतकार असलेल्या जावेद अख्तर यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात. हा एक प्रकारे मराठी भाषेचा अवमानच आहे. त्यामुळे साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचा निर्णय रहित करावा; अशी मागणी करून या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, तसेच आयोजक यांच्या नावे नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषेसाठी कवडीचेही योगदान नसणार्यांची वर्णी लागत असल्याने मराठीजनांचा अपेक्षाभंग होत आहे. मराठीजनांच्या विरोधानंतरही हिंदी आणि उर्दु गीतकार जावेद अख्तर यांना साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणे म्हणजे मराठीजनांचा अपमानच आहे. जावेद अख्तर हे अर्ध्या शतकाहून अधिक काळ महाराष्ट्र राज्यात अर्थात मराठी भूमीत रहात आहेत; मात्र एवढ्या वर्षांत त्यांनी मराठीच्या हितासाठी कधीही काम केलेले नाही. ते स्वतः देखील इतक्या वर्षांत मराठी भाषा न शिकता उर्दू-हिंदी भाषेतूनच काम करत आहेत.
*हिंदु तालिबान्यांच्या व्यासपीठावर जावेद अख्तर बसतील का ?*
काही दिवसांपूर्वीच अख्तर यांनी हिंदु राष्ट्राचे समर्थन करणार्यांची तुलना क्रूर आणि अत्याचारी तालीबान्यांसह केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेच्या मुखपत्रातून त्वरीत निषेधही करण्यात आला होता. शिवसेना पक्षप्रमुख मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी 2015 च्या दसरा मेळाव्यात जनतेला संबोधित करतांनाच भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. तसेच या हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडणारे स्वा. सावरकर यांनी १९३८ या वर्षी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. अशा स्थितीत जावेद अख्तर ज्यांना हिंदु राष्ट्रवाद्यांना तालिबानी असे संबोधतात, त्यांनी भूषवलेल्या व्यासपीठावर जावेद अख्तर बसणार आहेत का ? कसा आहे प्रश्न पत्रकात उपस्थित करण्यात आला आहे.
जावेद अख्तर यांनी हिंदू तालिबानी म्हणत हिंदू राष्ट्र समर्थकांचा घोर अपमान केला आहे.अशांना स्वा.सावरकरांच्या पदस्पर्शाने पावन नाशिक नगरीत साहित्य संमेलनात स्थान नकोच!