वाचकांचे पत्र:
मराठी पाट्यांऐवजी मराठी शाळा टिकविणे महत्वाचे !
राज्य शासनाने मराठी पाट्या लावण्याचा आग्रह धरला आहे, पण मराठी शाळाचं अस्तित्व जिथे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे तिथे मराठी पाट्या लावून उपयोग काय ? हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेला स्टंट वाटल्यास नवल ते काय? माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून राज्य सरकारचे प्रयत्न फारसे दिसत नाही, मात्र उर्दू शाळांना प्रोत्साहन देताना, किंवा मुंबईतील काही रेल्वेस्थानकांना उर्दु भाषेत नावे देण्याचा पण उपक्रम झाला आहे, जणू उर्दू भाषा ही राष्ट्रीय भाषा असावी, यावरून माय मराठी भाषेबद्दलची तोटकी आत्मीयता लक्षात येते. एकीकडे महानगरपालिकेच्या मराठी शाळा अल्प पटसंख्येमुळे बंद पडत आहेत. त्याकडेही शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मराठी शाळा टिकविणे गरजेचे असताना त्या विषयी प्रयत्न झाले तर ही राजकीय नौटंकी नाही हे तरी जनतेला कळेल. उगाच महाराष्ट्र आपल्याला मराठी अस्मिता म्हणून डोक्यावर घेणार नाही हे शासनाने लक्षात घ्यावे.
– रवींद्र हेम्बाडे, जळगाव