वाचकांचे पत्र:
महान ज्ञानयोगी : संत ज्ञानेश्वर
प्रति,
मा. संपादक,
संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील एक महान योगी होय. त्यांची आज सोमवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी जयंती साजरी होत असून त्यांनी दिलेल्या शिकवणीची उजळणी वर्तमान काळात आवश्यक बनली आहे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा ज्ञानमार्ग संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य जनतेला दाखविला. त्यांचा जन्म पैठण तालुक्यातील आपेगाव येथे श्रावण कृष्ण अष्टमी शके 1197 इ.स. 1279 मध्ये झाला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे असामान्यत्व अगदी लहानपणापासूनच दिसून येते. त्यांच्यातील योग शक्तीने त्यांनी रेड्याच्या तोंडून श्लोक बोलवून घेतले, पाठीवर मांडे भाजले, भिंत चालविली. मानवाचे कल्याण हा उद्देश असणाऱ्या अध्यात्माचा प्रसार त्यांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात करून केला आणि ज्ञानेश्वर माऊली ही सर्व संतांची माऊली झाली. आजही संपूर्ण महाराष्ट्र मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलीच्या नामाचा गजर करत नामसंकीर्तनात दंग होताना आपल्याला दिसून येतो.
“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती” याचा प्रत्यय सर्व संत व सर्वसामान्यांना ज्ञानेश्वर माऊलीच्या अध्यात्मिक प्रवासातून येतो. संत ज्ञानेश्वर महाराज हे विश्व कल्याणकारी साहित्याचे निर्माते होय. ज्ञानेश्वरांनी पसायदान, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठाचे अभंग आणि भावार्थदीपिका ज्ञानेश्वरी लिहून शतकानुशतके मानवाचे कल्याण करणारे, प्रेरणा देणारे साहित्य जगाला दिले. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरं आहोत व भागवत धर्म हा सर्वांसाठी समान आहे हे सांगून सर्वांना भक्तीचा मार्ग दाखविला. नामस्मरणाचे श्रेष्ठत्व व नामस्मरण हे माणसाचं जीवन सुख समृद्धीकडे नेणारे आहे हे हरिपाठाच्या 27 अभंगांमधून सांगत सर्वांना हरी भक्ती चे वेड लावले ते म्हणतात “हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी।। महान योगी चांगदेव यांना त्यांच्या विद्वत्तेचा गर्व झाला होता तेव्हा त्यांना उपदेशपर संत ज्ञानेश्वरांनी 65 ओव्यांचे पत्र लिहिले होते. ते म्हणत परमेश्वराला शुद्ध भाव आवडतो, अहंकारी मनात देव कधीच वास करत नाही. संसारिक मोह मायेतून प्रत्येक व्यक्तीला स्वतःला सोडवून घेता आले पाहिजे. जेवढ्या लवकर ही गोष्ट कळेल तेवढ्या लवकर ईश्वरप्राप्ती होईल. सर्वसामान्यांना नामस्मरण व भक्तीच्या माध्यमातून परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दाखविणाऱ्या या महान योगी संताने 1296 मध्ये आळंदी येथे समाधी घेतली अशा विश्व कल्याणकारी महान संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शतशः वंदन.