नंदुरबार – महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार करीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा व मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा; या मागणीसाठी नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. शत्रुराष्ट्राच्या दहशतवाद्यांशी संबंध ठेऊन देशद्रोह केला म्हणून नवाब मलिक यांच्याावर कठोरातली कठोर कारवाई करावी असे निवेदन देखील प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी नंदुरबार शहरातील मुख्य चौकात आंदोलन करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, शहराध्यक्ष नरेंद्र माळी, नगरसेवक प्रशांत चौधरी, भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनीषा निकम, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रकाश गवळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य अशोक चौधरी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल चौधरी, युवा मोर्चा शहरअध्यक्ष जयेश चौधरी, सांस्कृतिक सेल शहराध्यक्ष कैलास भावसार, उद्योग आघाडी शहराध्यक्ष रामनभाई दुसेजा, बाळा चौधरी आदि कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी उपनिवासी जिल्हाधिकारी श्री.सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्री नवाब मलिक याचे अंडरवर्ल्ड कनेक्शन समोर आले असल्याने महाराष्ट्र सरकारने ताबडतोब त्यांचा राजीनामा घ्यावा आणि भारतात छुपे युद्ध छेडून देशविघातक कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत संबंध ठेऊन देशद्रोह केला म्हणून कठोर कारवाई करावी; ही सगळ्या जनतेची भावना आहे. जनतेची ही भावना लक्षात घेऊन आम्ही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार कडे हीच मागणी करत आहोत. राज्याच्या व देशाच्या सुरक्षा यंत्रणेला आमचे निवेदन आहे की, देशाच्या शत्रूला मदत करून बेशरमपणे अंडरवर्ल्ड कनेक्शन जोपासणाऱ्या या मंत्र्याची जराही गय केली जाता कामा नये. दुर्दैव आहे की देशाच्या शत्रूला मदत केल्याचे उघड होऊन सुद्धा अशा मंत्र्यांचा राजीनामा न घेता त्याउलट पाठराखण केली जात आहे. यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने थेट दहशतवादाचे छुपे समर्थन केल्याचाच अर्थ घेतला जात आहे. देशाच्या शत्रूला मदत करणारे मंत्रिमंडळात राहतात, पूर्ण सरकार त्याच्या पाठिशी उभे राहते, हे चुकीचा संदेश देणारे चित्र आहे; असे निवेदनात म्हटले आहे.