(मिलिंद चवंडके)
नागपूर – महा कोल्डस्टोरेज असोसिएशनची सहावी वार्षिक सर्वसाधारण नुकतीच नागपूर येथे खेळीमेळीत संपन्न झाली, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजकिशोर केंडे (पुणे) व उपाध्यक्ष श्री. पुरुषोत्तम नावंदर (अहमदनगर ) यांनी दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्रामध्ये गेल्या सहा वर्षापासून महा कोल्डस्टोरेज असोसिएशन अविरत कार्यरत आहे. कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा वसा महा कोल्डस्टोरेज असोसिएशनने घेतला असून त्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात सरकार दरबारी असो किंवा काही महत्त्वाच्या सरकारी निर्णयात असोसिएशन आपले योगदान देत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जसे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या विभागातील कोल्ड स्टोरेज ओनर्स या संघटनेचे सभासद आहेत. देश पातळीवर कार्यरत असणारी ऑल इंडिया कोल्ड स्टोरेज फेडरेशन या संस्थेच्या नियमानुसार कार्यकारिणीत महा कोल्ड स्टोरेज असोसिएशनचे अध्यक्ष महाराष्ट्राच्यावतीने सहभागी होतात व आपली भूमिका वेळोवेळी मांडतात.
वार्षिक सर्वसाधारण सभेत परिसंवाद, चर्चासत्र व अभ्यास दौरा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सभेची सुरुवात नवीन सभासदांकडून दीप प्रज्वलन करून झाली. संघटनेचे अध्यक्ष श्री. राजकिशोर केंडे (पुणे ) यांनी स्वागत करून मनोगत व्यक्त केले.
संघटनेचे सचिव श्री. तुषार पारख (पुणे) व खजिनदार श्री. प्रतिक मेहता (अहमदनगर ) यांनी वार्षिक सभेची कार्यवाही पूर्ण केली.
किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेडचे डेप्युटी जनरल मॅनेजर (इक्विपमेंट्स अँड प्रोजेक्ट्स) श्री. अरविंद शेडगे (मुंबई ) यांनी किर्लोस्कर रिमोट मॉनिटरिंग सिस्टम फोर कॉम्प्रेसर या विषयावर परिसंवाद केला तसेच स्टार कुलर्स अॅन्ड कंडेन्सर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे श्री. अविनाश प्रभूमिराशी (जनरल मॅनेजर- मार्केटिंग जळगाव ) यांनी एअरकूल कंडेन्सर व आय क्यू एफ सिस्टम फोर फ्रुट्स अँड व्हेजिटेबलस या विषयावर परिसंवाद घेतला. सर्व सभासदांनी या दोन्ही कंपनीच्या प्रतिनिधींना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कंपनीच्या प्रतिनिधींचे सत्कार संघटनेचे उपाध्यक्ष श्री. पुरुषोत्तम नावंदर (अहमदनगर ) व उपसचिव श्री. अनिल कोरपे (पुणे ) यांनी शाल व स्मृतिचिन्ह देऊन केले.
संघटनेचे उपाध्यक्ष श्री. बिपिन रेवणकर (पुणे) व उपाध्यक्ष श्री. आदित्य झुनझुनवाला (नागपूर) यांनी वक्त्यांचे स्वागत करून परिचय करून दिला.
संघटनेचे समिती सदस्य श्री. सागर काबरा (मालेगाव) व श्री. प्रदीप मोहिते (कराड) यांनी नवीन सभासदांचे स्मृतिचिन्ह व वेलकम किट देऊन स्वागत केले.
कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सर्व समिती सदस्य व नागपूर येथील श्री. आदित्य झुनझुनवाला, श्री. संजय हेलीवाल , श्री. निखिल भोयर, श्री. राजेश खंडेलवाल व सर्व कमेटी मेंबर्स यांनी मुख्य भूमिका बजावली. संघटनेचे उपसचिव श्री. अनिल कोरपे यांनी आभार मानले. अभ्यास दौऱ्यामध्ये नागपूर येथील अन्न प्रक्रिया प्रकल्प व कोल्ड स्टोरेज यांना भेटी देण्यात आल्या.