धुळे – भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल व महिलांबद्दल केलेल्या विधानाचा तीव्र धिक्कार करीत धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या संतप्त महिला कार्यकर्त्यांनी दरेकर यांच्या प्रतिमेचे दहन केले.
तसेच ते धुळे जिल्हा दौऱ्यावर कधी आलेच तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस दरेकर यांना काळे फासून रंगविल्याशिवाय राहणार नाही; असा इशाराही या प्रसंगी देण्यात आला. जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, शहराध्यक्षा सरोज कदम, युवती जिल्हाध्यक्षा हिमानी वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष मालती पाडवी, जिल्हा कार्याध्यक्ष सरोज संजीवनी पाटील, शहर कार्याध्यक्ष तरूणा पाटील, विधानसभा अध्यक्ष धुळे तालुका माधुरी पाटील, जिल्हा सरचिटणीस सरोज पवार, युवती कार्याध्यक्षा चेतना पाटील, शारदा भामरे,रेखा सूर्यवंशी, वनिता गरुड व वर्षा सूर्यवंशी आंदोलनात उपस्थित होत्या. जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा म्हणाल्या की, ते आक्षेपार्ह विधान बौद्धिक दिवाळखोरी व बौद्धिक दारिद्र जगजाहीर करणारी आहे. प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महिलांची जाहीर माफी मागावी, नाही तर त्यांना काळे फासून रंगविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या धुळे जिल्हा महिला आघाडीने दिला आहे.