नंदुरबार – वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला लोकां देखत भर रस्त्यावर मारहाण करणाऱ्या माजी उपनगराध्यक्षाच्या पुत्राविरुद्ध राजकीय दबावाला बळी पडून गुन्हा दाखल केला जाणार नाही; असा कयास जनतेतून व्यक्त होत असतानाच अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार असल्याचे सांगून अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला हात घालणाऱ्यांना पोलीस नेमका काय धडा शिकवतात; याकडे अजूनही लोकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पोसणारे आपणच खास “पुरवठादार” आहोत; असा समज असलेले काही व्यावसायिक राजकारणी सध्या कायदे नियमांना आणि प्रशासनाला घाबरेनासे झाले आहेत. प्रशासनात आपला किती धाक आहे; हे छोट्या मोठ्या प्रसंगातून ते लोकांना दाखवत असतात. भर चौकात महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलण्यासारखे प्रकार अशा प्रवृत्तींचे लाड केल्याचीच निष्पत्ती आहे; अशा भावना जनतेतून जाहीरपणे उमटत आहेत. असंख्य सेवाभावी उपक्रम राबवून जिल्हा पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचे काम एकीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी केले असताना दुसऱ्या बाजूने मात्र असेही प्रकार घडत असून गुन्हेगारांवर खरोखरची कारवाई केली जावी; ही अपेक्षा लोकांमधून व्यक्त होत आहे.
याप्रकरणी अधिक वृत्त असे की, शनिवार दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी प्रसिद्ध शिव कथाकार पंडित मिश्रा यांची मोठी मिरवणूक नंदुरबार शहरात पार पडली. अलोट गर्दी असल्यामुळे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील अंधारे चौकात या मिरवणुकीच्या बंदोबस्ताला असलेल्या शहर वाहतूक शाखेच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लोकांसमक्ष एका तरुणाने मारहाण केल्याची घटना दुपारी एक वाजता घडली होती. त्याप्रसंगी दुसऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेऊन त्या तरुणाला पकडले. अन्य पोलीस कर्मचारी देखील धावून आले मात्र तो तरुण आपल्या भावासोबत फरार होण्यात यशस्वी झाला. दरम्यान जाहीरपणे लोकां देखत महिला पोलीस कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून मारहाण करून जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा हा मस्तवालपणा करणारा तरुण एका राजकीय व्यक्तीचा मुलगा असल्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब होत राहिला. परंतु सोशल मीडिया वरून मारहाणीचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि जनतेतून उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दखल घ्यावे लागली. हा गुन्हा दाखल होऊ नये यासाठी रात्री उशिरापर्यंत एक जमाव पोलीस ठाण्यात बसून होता. अखेरीस नंदुरबार नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष यांचे पुत्र सरोज परवेझ खान वय 22 आणि सरजिल परवेझ खान वय 24, दोन्ही रा. मन्यार मोहल्ला नंदुरबार यांच्याविरुद्ध महिला पोलीस कर्मचारी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणणे, विनयभंग करणे मारहाण करणे याविषयीचे कलम लावण्यात आले. मागील भांडणाचे कारणावरुन ही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अश्लील घाणेरड्या भाषेत फिर्यादीस लाज वाटेल अशा पध्दतीने शिवीगाळ केली, फिर्यादीने परीधान केलेल्या ट्राफिक पोलीस युनीफॉर्मची कॉलर ओढून हाताबुक्यांनी फिर्यादीस मारहाण केली, सदर मारहाणीत फिर्यादीला उजव्या खांदयाला व डोक्याला तसेच पोटाला दुखापत झाली; असे देखील फिर्यादीत म्हटले आहे.