नंदुरबार – शहर वाहतूक नियंत्रित करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला एका उद्दाम युवकाने भर रस्त्यात लोकांसमोर मारहाण केल्याची घटना आज दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी दुपारी घडली. व्हिडिओ क्लिप सर्वत्र जोरदार व्हायरल होत असल्याने हा विषय चर्चेचा बनला आहे. चक्क पोलिसांच्या समक्ष ही घटना घडलेली असतानाही त्या युवकाला इतर पोलिसांनी दुचाकी वर बसवून फरार होण्यास सहकार्य केल्याचे व्हिडिओ क्लिप मधून निदर्शनास येत असल्याने त्याविषयी देखील संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
या प्रकरणातील घटनास्थळावरून फरार झालेला युवक एका राजकीय व्यक्तीचा पुत्र असून गुटखा व्यवसायाशी संबंधित या परिवाराचा पोलिसांमध्ये दबदबा असल्याचे बोलले जात आहे. भर रस्त्यात जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिष्ठेवर घाला घालण्याचा मग्रूरपणा त्यामुळेच हा युवक करू शकला; असे घटनास्थळी जमलेल्या लोकांमध्ये बोलले जात होते. यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला हात घालणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटनेचे अधिक वृत्त असे की, नंदुरबार येथे आज दिनांक 22 एप्रिल 2023 रोजी पंडित मिश्राजी यांची शिवकथा आयोजित करण्यात आली होती. पंडित प्रदीप मिश्रा यांची शोभायात्रा पाहण्यासाठी अंधारे चौकात गर्दी होती. त्यामुळे शहरातील वाहतुकीवर ताण पडू नये म्हणून मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. वाहतूक नियंत्रक विभागाचे पोलीस वाहतूक नियंत्रित करीत असतानाच बंदोबस्त हाताळणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याशी एका युवकाने अचानक वाद घातला, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप मध्ये, कथित मारहाण झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीला धावून आलेली दुसरी महिला पोलीस कर्मचारी दिसत आहे. त्या आक्रमक बनलेल्या तरुणाला आवरत असून त्या तरुणाने मारहाण केल्याची माहिती इतर पुरुष पोलीस कर्मचाऱ्यांना देत आहे, असे दृश्य दिसते. तथापि घटनेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
दुपारी चार वाजेपर्यंत शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता या मारहाण प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, या प्रकरणातील पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यास वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. शिव कथेचा बंदोबस्त अक्षय तृतीयेनिमित्त चे कार्यक्रम तसेच ईद चा बंदोबस्त या कारणामुळे वरिष्ठ अधिकारी व्यस्त होते त्यामुळे ही घटना नेमकी कशामुळे घडली आणि मारहाण खरोखर झाली किंवा नाही याची खात्री करून माहिती घेण्यास वरिष्ठांकडून विलंब होत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की “आम्ही बंदोबस्तात असल्यामुळे प्रत्यक्ष घटना काय घडली आम्हाला माहित नाही. तसा काही प्रकार घडला असल्यास गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल.” एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा भर रस्त्यात अपमान करणाऱ्या आणि जिल्हा पोलीस दलाच्या प्रतिष्ठेला हात घालणाऱ्या तरुणाविषयी वरिष्ठ पोलीस अधिकारी काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.