नंदुरबार – नायलॉन प्लास्टिक मांजामुळे मोठे दुष्परिणाम दिसू लागले असून निरागस पक्षांना हकनाक जीव गमवावा लागत आहे.ही बाब चिंताजनक असून मांजामुळे ईजा पोचलेल्या पक्षांवर प्रथमोपचार करण्याची व्यवस्था शाळेत केली असल्याचे श्रॉफ हायस्कूलच्या मुख्याध्यापक सौ.सुषमा शहा यांनी जाहीर केले आहे.नायलॉन प्लास्टिक मांजा वापर टाळण्याचे आवाहन करत त्यांनी सुरक्षित संक्रांति साजरा करण्याचे आवाहन केरणारी चित्रफित विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केली आहे.
चित्रफित
पर्यावरण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न शासन आणि शैक्षणिक संस्थांमार्फत केला जात आहे. पर्यावरणाची सुरक्षा होण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापक सौ. सुषमा शाह यांनी पतंगोत्सवात नायलॉन मांजा घातक ठरत असल्याचे विद्यार्थ्यांवर चित्रफितीच्या माध्यमातून बिंबविले.पक्ष्यांचा या प्लास्टिक दोऱ्यामुळे हकनाक जीव जातो.त्यांची मान, पंख व शारीरिक अवयव कापले जातात.तसेच विद्युत वाहिन्यांसोबत या प्लास्टिक दोऱ्याचे घर्षण झाले तर अग्नि उपद्रव होतो व मोठ्या हानीचा सामना करावा लागत असतो. प्लास्टिक मांजाचे हे दुष्परिणाम टाळण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
पतंग दोऱ्यामुळे ईजा पोहोचलेल्या पक्षांवर मकर संक्रांतीच्या दिवशी श्राॅफ हायस्कूलच्या कार्यालयात प्रथमोपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी प्रथमोपचार किट उपलब्ध केल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच प्राणी, पक्षांविषयी ममत्व, जिव्हाळा राखत निसर्ग पूजक सण साजरा करण्याचे नम्र आवाहन केले आहे.