संभाव्य तिसऱ्या लाटेची दक्षता; रुग्णांना मिळतील तात्काळ उपचार
नंदुरबार – माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून धडगाव नगरपंचायत व नंदुरबार नगरपालिकेला प्रत्येकी १ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली असून, रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिकेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शिवसेनेचे नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते आज मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील वाड्या पाड्यांवर राहणाऱ्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावे यासाठी धडगाव नगरपंचायतीला १ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नंदुरबार पालिकेला देखील दोन रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे,पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील,नगरसेवक कुणाल वसावे,सुनील सोनार, अभियंता विशाल कांबळे, गजेंद्र शिंपी,प्रविण गुरव,प्रीतम धंढोरे,प्रेम सोनार, चेतन वळवी,फारूक मेमन,फरीद मिस्तरी,मोहित राजपूत आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या महामारीत रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे रुग्णवाहिकेची मोठ्या प्रमाणावर गरज भासत होती. अशावेळी खाजगी रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक होत होती. रुग्णवाहिका भेटलीच तर त्यात अत्यावश्यक सोयीसुविधा नव्हत्या. अशावेळी रस्त्यातच रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या रुग्णवाहिका अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे.
डॉक्टरांची नेमणूक करणार
रुग्णवाहिकेतील रुग्णास पुढील उपचारासाठी बाहेर गावी हलविण्याच्या वेळेस रुग्णवाहिकेसोबत एका डॉक्टरास रुग्णालयापर्यंत पाठवण्यात येईल. मानधन तत्वावर डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार असून, सध्या प्रक्रिया सुरू असल्याचे माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले