माथेफिरूंचे शहाद्यातील भयानक दुष्कृत्य ! तोडणीला आलेला 58 एकरातला ऊस केला जाळून खाक

नंदुरबार – शहादा तालुक्यातील परीवर्धा येथील शेतकऱ्यांवर आभाळ कोसळावे अशी अत्यंत वाईट दुर्घटना घडली असून कोणी तरी आग लावल्याने सुमारे 58 एकर वरचा काढणीला आलेला ऊस जळून खाक झाला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी घडवलेला हा प्रकार असल्याचा संशय स्थानिक लोकांनी व्यक्त केला आहे. वारंवार घडवल्या जाणाऱ्या या घटना लक्षात घेऊन संबंधित गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त केला जावा, अशीही अपेक्षा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ज्या शेतांमध्ये आग लागली ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणचे आहे. तसेच त्या कालावधीत  काही ठिकाणी वीज खंडित होती, असे सांगण्यात येते. यावरून संबंधित माथेफिरुने नियोजनपूर्वक हे दुष्कृत्य केल्याचे उघड होत आहे.

10 शेतकऱ्यांना या आगीची झळ बसली असून यात शेतकऱ्यांचे 50 ते 60 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार परिवर्धे ता. शहादा येथील काही शेतांमध्ये आज दि.20 डिसेंबर 2021 रोजी रात्री 12 च्या सुमारास अज्ञात माथेफिरुंनी आग लावल्याचे ग्रामस्थांना निदर्शनास आले. त्यानंतर एकच धावपळ उडाली. आग विझविण्याचा आटोकााट प्रयत्न करण्यात आला. तथापि तब्बल 58 एकर वरील तोडणीस आलेला ऊस जळून खाक झाला. कोरोना कालावधीतील आर्थिक फटका आणि विद्यमान महागाई झेलून उभा राहू पाहणाऱ्या या शेतकऱ्यांना हा मोठा प्रहार झेलावा लागला आहे.

दरम्यान ही घटना कळाल्यानंतर शहादा येथील विभागीय पोलीस अधिकारी घुमरे, पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्यासह पोलीस ताफ्याने भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. शहादा पोलीस ठाण्यात रात्री पर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू होती.

प्राप्त माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांचा ऊस जळाला ते या प्रमाणे – जगन्नाथ पुरुषोत्तम पाटील परी 8 एकर, भगवान नथ्थु पाटील परी 5 एकर, चुनिलाल दिलीप पाटील वर्धे 4 एकर, मोहन दगडु पाटील वर्धे 4 एकर, विजय सदाशिव पाटील वर्धे 4 एकर, गुलाल नरसई पाटील वर्धे 12 एकर + ठिबक संच, विलास त्र्यंबक पाटील वर्धे 6 एकर, डाँ.सुरेश गोविंद पाटील वर्धे ह.मु.लोणखेडा 5 एकर, राजाराम रोहिदास पाटील परी 5 एकर, मनोहर विठ्ठल पाटील परी 5 एकर. असा एकूण 58 एकर ऊस रात्री 12 च्या सुमारात जळून खाक झाला.

ग्रामस्थांकडून याविषयी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनी सांगितले की, अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. त्या गाव शिवारात अश्या घटना नेहमीच घडतात. पोलिस येतात, चौकशी करतात नंतर काहीच कार्यवाही होत नाही. असले कृत्य करणाऱ्या, पिकांचे नुकसान करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी हीच अपेक्षा आहे. घटनांची वारंवारता लक्षात घेता पेट्रोलिंग सारखे उपाय करणे संशयितांचा कसून मागोवा घेणे असे का केले जात नाही ? पोलिस प्रशासन शेतकऱ्यांसाठी नाही का ? अशा संतप्त प्रतिक्रिया स्थानिक लोकांकडून दिल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!