मिठात पुरलेल्या मुलीचे प्रकरण तापले; अत्याचार करुन खून? मुंबईतील दुसरा पोस्टमार्टम अहवाल गुढ उलगडेल? 

नंदुरबार – मुलीवर झालेल्या अत्याचाराची चौकशी व्हावी; अशी मागणी करीत अत्याचार झालेल्या मुलीच्या पित्याने तिचा मृतदेह तब्बल 42 दिवस मिठामध्ये गाडून ठेवल्याचा अत्यंत गंभीर व मनाला चटका लावणारा प्रकार उघड झाल्यापासून वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्ता खासदार हिना गावित, शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमशा  पाडवी यांच्यासह अन्यपक्षीय पदाधिकारी चौकशीच्या मागणीसाठी आक्रमक बनल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भोवती राजकीय वादळ उभे राहण्याची शक्यता आहे.
हे वादळ उभे राहिल्यानंतर ४४ व्या दिवशी मुंबईला पुन्हा शवविच्छेदनासाठी मृतदेह घेण्यात आला. काल बुधवारी सायंकाळी नंदुरबार जिल्हा आरोग्य विभागाचे पथक, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांच्यासह पोलीसांचा फौजफाटा रुग्णवाहिका घेवून खडक्या गावी रवाना झाला. रात्री मयत मुलीचा मृतदेह पोलीस बंदोबस्तमध्ये रुग्णवाहिकेने मुंबईला नेऊन मुंबईतील जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गुरुवारी रात्रीपर्यंत ही प्रक्रिया चालू होती.
 याविषयी पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या नोंदी नुसार आरोपी  रणजित जत्रा ठाकरे वय-१९ हा अंतरसिंग कन्या वळवी वय ४२ रा.खडक्या ता.धडगाव यांच्या विवाहित मुलीशी
 जवळीक साधून शरीर सुखाची मागणी करत होता व त्रास देत होता. 1 ऑगस्ट 2022 रोजी रणजीत याने मित्र समवेत मोटरसायकलवर येऊन तिला बळजबरीने सोबत नेऊन पुन्हा शरीर सुखाची मागणी केली. त्यामुळे या 27 वर्षीय विवाहित मुलीने खडक्या ता.धडगाव येथील वावीचा कारभारीपाडा येथे आंब्याच्या झाडाच्या फांदीला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फिर्यादी अंतरसिंग कन्या वळवी वय ४२ रा.खडक्या ता.धडगाव यांच्या फिर्यादीवरून रणजित जत्रा ठाकरे वय-१९ रा. वावी ता. धडगाव जि. आणि त्याचा मित्र अशा दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 1 ऑगस्ट 2022 रोजी रात्री आठ ते साडेनऊ वाजे दरम्यान घडली होती.  धडगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान करण्यात आली. अपरात्र असल्याने सकाळी पोलीस स्टेशनला कळवून प्रेत पोस्ट मार्टमसाठी सरकारी दवाखाना धडगाव येथे आणून फिर्याद दिल्याने नोंद करण्यास उशीर झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. घटनास्थळी विभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे आणि पोलीस निरीक्षक यांनी भेट दिली व  पोसई डी के महाजन यांच्याकडे तपास सोपविला. नंतर आरोपीला अटक करण्यात आली.
परंतु मुलीच्या नातलगांचे म्हणणे आहे की, काही जण माझ्यावर अतिप्रसंग करू पाहत असून माझ्या जीवाला धोका आहे; असे सांगणारे संदेश व फोटो त्या मुलीने पाठविले होते. आम्ही धावत गेलो तेव्हा आंब्याच्या झाडावर तिचा मृतदेह लटकलेला दिसला इतक्या उंचावर एकटी मुलगी चढू शकत नाही. मुलीवर बलात्कार झाला असून त्यानुसार गुन्हा दाखल व्हायला हवा होता त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला नाही तसेच मुलीचे योग्य पोस्टमार्टम  करण्यात आले नाही, या प्रकरणाची सखोल चौकशी होईल तरच अंतिम संस्कार करू अशी ठाम भूमिका घेत वळवी यांनी मुलीचा मृतदेह मिठात पुरवून ठेवला.  मुलीच्या वडिलांचा आणि नातंलगांचा दावा आहे की, त्यानंतर 42 दिवस उलटले तरीही काहीही योग्य कारवाई झालेली नाही आणि न्याय मिळाला नाही. यामुळेच संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून 42 दिवस उलटेपर्यंत दखल का घेण्यात आली नाही? हा प्रश्न चर्चेत आला आहे व सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.
काही स्थानिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, मृतकचे वडिल व नातेवाईक यांचे म्हणने ऐकले असते तर समोरिल घटना घडली नसती.  पोलिस आधिक्षक यांना दीलेल्या तक्रारीनंतर  विशेष पथक न नेमणे अथवा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने त्रास देणाऱ्या तरुणांची धरपकड करणे अपेक्षित होते आनोळखि आरोपी पकडण्यात आले नाहीत म्हणूनच पुढील घटना वाढत गेली असे स्थानिकांचे म्हणणे आहे. यावरून आता चांगलेच राजकीय वादळ उठले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खासदार डॉक्टर हिना गावित यांनी ताबडतोब दाखल घेऊन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांना पत्र देऊन कडक कारवाई करण्याचे तसेच सखोल चौकशीची मागणी केली आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनी देखील निवेदन देऊन संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत तसेच या प्रकरणी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे हे या प्रकरणात भेट देऊन आज 16 रोजी भूमिका मांडणार आहेत. या एकंदरीत प्रकारामुळे नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी राजकीय वादळात घेरले जाण्याची शक्यता दिसत आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराविषयी देशभरात भावना तीव्र असताना आणि बेटी बचाव घोषणेला प्राधान्य देण्याची भाषणे व्यासपीठावरून केली जात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीचे पाऊल या प्रकरणात का उचलले नाही? यावर आदिवासी संघटनाही आक्रमक बनण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!