नंदुरबार – मुंबई महानगरपालिकाच्या धर्तीवर नंदुरबार शहरातील ५०० चौरस फुटापर्यंत घरांचा मालमत्ता कर रद्द करून नंदुरबार वासियांनाही सवलत द्यावी, अशी मागणी नंदुरबार नगरपालिकेतील भाजपाच्या नगरसेवकांनी केली आहे.
या मागणीचे पत्र नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना काल दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी देण्यात आले. मुंबई महापालिकेने त्यांच्या क्षेत्रातील मालमत्ताधारकांना कर माफी देणारा निर्णय नुकताच जाहीर केला. राज्यातील हा असा पहिलाच निर्णय असून त्याचे पडसाद राज्यात उमटतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार वासीयांच्यावतीने करण्यात आलेली करमाफीची ही मागणी लक्षवेधी ठरली आहे.
नंदुरबार नगरपालिकेतील भाजपाचे गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेवक आनंद माळी, प्रशांत चौधरी, नगरसेविका सिंधुबाई दशरथ माळी, सौ.संगिता वसईकर यांच्या स्वाक्षऱ्या या पत्रावर आहेत. या पत्रात म्हटले आहे की, मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० चौरस फुटांआतील घरांचा मालमत्ता कर रद्द करणेबाबत नुकताच निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे. यामुळे मुंबई शहरात राहणाऱ्या गोरगरीब लवकरच जनतेला दिलासा मिळणार आहे. राज्यात नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित व तुलनेने सर्वाधिक गरीब जिल्हा आहे. तसेच मागील दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक परिस्थिती कमालीची खालावली आहे. हे पाहता मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवर नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने शहरातील ५०० चौरस फुटांपर्यंतचे घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याबाबतचा ठराव करून शासनाकडे पाठवावा व कोरोना काळात पिचलेल्या सर्वसामान्य नागरीकांना जनतेला दिलासा द्यावा, असेही पत्रात म्हटले आहे.