नंदुरबार – अत्यंत सुबक चित्र रेखाटण्याची आगळीवेगळी कला जोपासणारे नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी आज नंदुरबार दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना त्यांचे अत्यंत सुबक रेखाटलेले चित्र भेट देऊन आश्चर्याचा धक्का दिला. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे स्वतः ही आगळीवेगळी भेट स्वीकारताना कमालीचे आनंदी व प्रभावित झालेले दिसले.
कायदा सुव्यवस्था राखताना गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी कायम सतर्क आणि कर्तव्य कठोर वर्तणूक ठेवावी लागत असल्याने खाकी वर्दीतील प्रत्येक जण धडकी भरवणाराच वाटतो. तथापि नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील याला अपवाद ठरले आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा जिल्हा मेळावा आणि नंदुरबार नगर परिषदेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण या साठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे शनिवार दिनांक 29 ऑक्टोबर 2022 रोजी नंदुरबार दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमांच्या दरम्यान भोजन समयी निवांत क्षणी जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे रेखाटलेले चित्र दाखवले आणि ती प्रतिमा सप्रेम भेट दिली. आपले एवढे सुंदर चित्र रेखाटलेले पाहून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे प्रभावित झाले नसते तरच नवल! खाकी वर्दीतील अधिकारी एवढे सुंदर कलात्मकता जोपासून आहे याचा उल्लेख करीत आश्चर्य मिश्रित कौतुक केले. एवढेच नाही तर “आमच्या निवासस्थानी एकदा स्नेहभोजनाला या” अशा शब्दात स्वतः मुख्यमंत्री निमंत्रण द्यायला विसरले नाही. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.
राष्ट्रपुरुष अभिनेते किंवा नामांकित प्रभावी नेते यांचे प्रसंगोचित क्षणी उभेउभ रेखाचित्र अवघ्या काही मिनिटात रेखाटण्याची विशेष हातोटी जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना अवगत आहे यापूर्वी देखील गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले त्याप्रसंगी त्यांचे आकर्षक रेखाचित्र त्यांनी रेखाटले होते. दिलीप कुमार यांनाही रेखाचित्राद्वारे श्रद्धांजली अर्पित केली होती. एक आकर्षक अल्बम बनू शकेल इतके प्रकारचे रेखाचित्र आतापर्यंत त्यांनी रेखाटले आहेत. यामुळे नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या कलेला जाणून असलेला विशिष्ट चाहता वर्ग बनला आहे. कलात्मकता सृजनता यांचा खाकीवर्दीशी दुरान्वयानेही संबंध नसतो; हा रूढ झालेला समज एका अर्थाने त्यांनी या माध्यमातून खोडून काढला आहे.