नंदुरबार – नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या प्रथमच पार पडलेल्या निवडणुकीतील मतांची मोजणी सलग 12 तास उलटल्यानंतरही चालूच असून निवडणूक कर्मचाऱ्यांना या मतमोजणीने चांगलाच घाम फोडला आहे. 36 हजार हून अधिक संख्येच्या मतपत्रिका मोजाव्या लागत असल्याने सायंकाळ उलटल्यावरही अधिकृत निकाल कोणाच्याच हाती आलेला नाही.
तीस वर्षांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक आणि स्वर्गीय मंत्री माणिकराव गावित यांनी नवापूर तालुक्यात डोकारे येथे पहिला आदिवासी सहकारी साखर कारखाना स्थापन केला. कारखाना स्थापनेपासून संचालक मंडळाची निवडणूक पाच वेळा बिनविरोध झाली होती. मात्र, आता 25 वर्षानंतर म्हणजे या सहाव्या पंचवार्षिकनिमित पहिल्यांदाच कारखान्याच्या निवडणूकीत मतदानाचा प्रसंग उद्भवला. यात थेट राजकीय गट सक्रिय दिसले. गावित आणि नाईक परिवार एकमेकांसमोर उभे असून, सत्ता कोण काबीज करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष आमदार शिरीष नाईक यांचे शेतकरी विकास पॅनल व भाजपाचे भरत गावित यांचे परिवर्तन पॅनल यांच्यात ही सरळ लढत आहे. संचालकांच्या १७ जागांपैकी शेतकरी विकास पॅनलचे २ उमेदवार आधीच बिनविरोध झाले आहेत. १५ जागांसाठी पाच गटांत मतदान झाले. काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे १५, तर भाजप पुरस्कृत परिवर्तन पॅनलच्या १४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहे.
परंतु नवापूर शहरात ६, नवागाव ६, विसरवाडी ६, खांडबारा ४, नंदुरबार २ असे एकूण २४ मतदान केंद्रांवर पार पडलेल्या या मतदानाच्या मोजणीची प्रक्रियेने प्रशासनाला पार मेटाकुटीस आणले. ही मतमोजणी आज रविवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेपासून सुरू झाली. ती थेट रात्रीच्या आठ वाजे नंतरही चालूच होती. 12 टेबलवर चालू असलेली मतमोजणी प्रत्येक कर्मचाऱ्यांचा घाम काढत आहे. कारण हे मतदान मशीनद्वारे झालेले नसून बॅलेट पेपरवर झालेले आहे. एकूण ९,७१९ पैकी ५,१३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एका मतदाराला 7 बॅलेट पेपर हाताळायचे म्हटल्यावर कर्मचाऱ्यांना किती कागद मोजावे लागत आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. त्यात आणखीन मतदारांमध्ये वृद्धांची संख्या अधिक प्रमाणात होती परिणामी कोणी कुठे शिक्के मारले कोणाच्या नावाचा काय घोळ झाला यासह अनेक तांत्रिक मुद्दे मोजणी करताना तपासावे लागत आहेत परिणामी पूर्ण निकाल हाती यायला ही मतमोजणी 15 तासाहून अधिक वेळ घेणार हे स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा सहायक निबंधक भारती ठाकूर, सहायक निवडणूक अधिकारी निरज चौधरी, क्षेत्रीय अधिकारी सचिन खैरनार तसेच पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे लक्ष ठेवून आहेत. राजकीय रस्सीखेच लक्षात घेता कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.