नंदुरबार – केंद्र सरकारच्या “हर घर नलसे जल” या महत्वकांक्षी योजनेंतर्गत नळ-पाणी विषयक कामाचे आराखडे मंजुर करायचे असल्यामुळे वाघोदा, पातोंडा, होळ तर्फे हवेली, दुधाळे, रनाळे, शनिमांडळ आणि कोपर्ली या गावांमधील ग्रामस्थांनी जाहीर करण्यात आलेल्या वेळेत ग्रामसभेला आवर्जून उपस्थित राहावे; असे आवाहन खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केले आहे.
पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देतांना खासदार डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की, काही गावांमधील पुढील 30 वर्षानंतर होणारे बदल आणि भविष्यात ऊद्भवणारी गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या “हर घर नलसे जल” या महत्वकांक्षी योजनांतर्गत विकसनशील प्रमुख गावांमधील पाणी पुरवठ्याची सोय केली जात आहे. त्या कामाचे आराखडे अंतिम केले जाणार होते. तथापि भारत सरकारला मी विनंती केली की, ज्या गावात नळ योजना देतोय त्या गावातील लोकांना आराखडा पाहून सुधारणा सांगण्याची संधी द्यावी. त्यानुसार ही संधी देण्यात आली आहे व त्या-त्या गावातील लोकांना ग्रामसभा घेऊन आराखडे दाखवले जाणार आहेत.
ग्रामस्थांकडून त्या ग्रामसभेत ज्या दुरुस्त्या सुचवल्या जातील त्यानुसार आराखडा मंजूर केला जाणार आहे. तरी दि.2 आणि 3 जानेवारी या दिवशी होणाऱ्या सदर विशेष ग्रामसभेसाठी गावातील सर्व नागरीकांनी उपस्थित राहून नियोजीत आराखड्यात काही घरे सुटली असतील, पाण्याचा उद्भव संदर्भात काही म्हणणे असेल किंवा आपणास या संदर्भात काही सुचना करावयाच्या असतील तर त्या सभेत मांडाव्यात, सदरच्या आराखड्याला ग्रामसभेने मान्यता दिल्यानंतर कोणाचेही म्हणणे विचारात घेतले जाणार नाही, असेही खासदार डॉक्टर हिना गावित म्हणाल्या.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाव्दारे ग्रामीण पाणीपुरवठा कामांना नियोजीत आराखड्यानुसार मंजुरी देण्यासाठी खालीलप्रमाणे गावांच्या विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. खा.डॉ. हिना गावित, आ. डॉ. विजयकुमार गावीत व सर्व संबंधित अधिकारी या सभेस आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
विशेष ग्रामसभांचा कार्यक्रम असा-
ग्रामसभा दिनांक २ जानेवारी २०२२ रोजी वाघोदा सकाळी ९ वाजता, पातोंडा सकाळी १०.३० वाजता, होळ तर्फे हवेली दुपारी १२ वाजता, दुधाळे दुपारी २ वाजता, रनाळे दुपारी ३.३० वाजता, शनिमांडळ संध्या. ५ वाजता, दि. 3 रोजी कोपर्ली सकाळी ९ वाजता.