या दिवाळीला उजळवू या ज्ञानदीप !
घरोघरी आनंदाचे तोरण चढविणारा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये आनंद, उत्साह व चैतन्य रुजविणारा सण म्हणजे दिवाळी होय. आश्विनवद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी) आश्विनवद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी) अमावस्या (लक्ष्मीपूजन), कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलिप्रतिपदा) आणि यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज असे पाच दिवस दिवाळी हा सण साजरा होतो. या पाचही दिवसांचे वेगळे महत्त्व आहे आख्यायिका आहेत व शास्त्रोक्त पद्धतीने आपण ते का व कसे साजरे करायचे याचे सुंदर वर्णन आपल्याला शास्त्रात दिसून येते परंतु आज दिवाळी म्हटली की मौजमजा करण्याची जणू परंपराच पडली आहे. सध्याची देशाची व जागतिक स्थिती पाहता आमचे व समाजाचे मनोध्यैर्य टिकणे, आहे त्या परीस्थीतीत समधानाने राहाता येणे व येणाऱ्या परिस्थीतिचा स्विकार् करता येणे गरजेचे आहे. मौजमजेपेक्षा ही दिवाळी अनोख्या पद्धतीने वैचारिक स्तरावर साजरी करून स्वतःही आनंद घेऊ या व इतरांनाही आनंद देऊंया. धनत्रयोदशी या दिवशी धन म्हणून सुवर्ण अलंकार विकत घेण्याची प्रथा आहे आपल्या जीवनाचे पोषण ज्याच्यामुळे सर्व सुरळीत चालू आहे त्या धनाचे या दिवशी पूजन करतात. या दिवशी धन खरेदी करण्याचा प्रघात आहे कारण वर्षभर त्यामुळे लक्ष्मी घरात वास करते आज खऱ्या अर्थाने जगभरात गरज आहे ती ज्ञानरूपी धनाची, ज्ञानातून मिळणाऱ्या मूल्य व संस्कारांची, आत्मिक शांती व सहकार्याची. संस्कारा अभावी ढासळत चाललेली नैतिकता, किशोरवयीन मुलांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता, त्यातून येणारे नैराश्य राग कधीकधी येवढ्या टोकाचे होतात की समाजाचे, नात्यांचे कुठलेही भान त्यांना राहत नाही व त्यातूनच वाढणारी गैरकृत्ये, गुन्हे, अपराध आज आम्हाला समाजात सर्रास दिसून येत आहेत. नात्यांमधील भावनिकता व प्रेम जाऊन कृत्रिमता आली आहे, तो प्रेमाचा ओलावा कुटुंबात नात्यात परत हवा असेल तर गरज आहे ती संस्कारांची. ही मुल्ये व संस्कार करोडो लाखो रुपये खर्चूनही आम्हाला बाजारात मिळणार नाही तर आमच्या पूर्वजांनी जतन केलेल्या आमच्या अमूल्य अशा ज्ञानाच्या भांडारातून ती आम्हाला आत्मसात करावी लागतील आमच्या कृतीमधून पुढच्या पिढीला अलगद सुपूर्त करावी करावी लागतील. आज हे वेद, पुराण व धर्मग्रंथातील ज्ञान सोप्या भाषेत उपलब्ध आहे. गरज आहे ते घराघरात पोहचविण्यची. दिवाळीला खरेदी करू या. अशा ज्ञानरुपी ग्रंथांची व ज्ञान ज्योतीची दिवे उजळवू या , आपल्या दारी तसेच इतरानांही भेट देऊन आपला आनंद द्विगुणीत करू या ! चला तर मग या दिवाळीला उजळवू या ज्ञानदीप !
– डॉ० पी. एस. महाजन, संभाजीनगर