युध्दाचे भाकित ठरले खरे ; कुंडल्या जाळणारे बोध घेतील का?
(पंकज बागूल, धुळे)
भारतीय ज्योतिषाने वर्तवलेल्या भविष्यानुसार रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला २४ फेब्रुवारीला खरोखर प्रारंभ झाला आहे आणि भारतातील ज्योतिषशास्त्र किती प्रगत आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ज्योतिष शास्त्र एक थोतांड आहे असे सांगत कुंडल्या जाळण्याचे जाहीर कार्यक्रम घेणाऱ्या समस्त बुद्धिवाद्यांना बसलेली ही जाहिर चपराकच म्हणावी !
जागतिकयुद्ध आणि अन्य मोठ्या घटना नमूद करणारे जेवढे भाकीत ज्योतिष शास्त्रज्ञांनी मांडले ते बहुतांश सत्यात उतरलेले दिसले आहेत. युक्रेन आणि रशिया युद्धाचा प्रसंग त्यातलाच एक आहे. हे असे घडणार, याचे भाकीत तारीखनिहाय करण्यात आले होते. प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात म्हटले आहे की, ज्योतिषी पंडित संजीवकुमार श्रीवास्तव यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी ट्वीट करून वर्तवले होते. त्यांनी केलेल्या भाकितानुसार २४ फेब्रुवारीच्या पहाटे खरोखर या युद्धाला प्रारंभ झाला. ‘माझ्या गणनेनुसार वाटाघाटी किंवा चर्चा २३ फेब्रुवारीपर्यंत होऊ शकतात आणि २४ फेब्रुवारी २०२२ नंतर कोणत्याही दिवशी युद्ध होऊ शकते. २४ फेब्रुवारीनंतर चर्चा अयशस्वी होईल. ग्रह आणि नक्षत्र यांनुसार रशिया अन् युक्रेन यांच्यातील युद्ध कधीही चालू होऊ शकते. त्यातही ते २४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२२ या काळात हे युद्ध होऊ शकते. यात युक्रेनची हानी होईल. ही परिस्थिती १५ मार्च ते ५ मे २०२२ या काळात नियंत्रणात येऊ शकते’, असे भविष्य ज्योतिषी पंडित संजीवकुमार श्रीवास्तव यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी ट्वीट करून वर्तवले होते. त्यांनी केलेल्या या भाकितानुसार २४ फेब्रुवारीच्या पहाटे या युद्धाला प्रारंभ झाला. ज्योतिष शास्त्राचे महत्व्व पटवून देणारी ही घटना म्हणता येईल.
याबरोबरच या युद्धाविषयी एका हिंदी पंचांगातून व्यक्त केलेल्या भविष्यवाणीचे कात्रण सध्या सोशल मीडियातून सर्वत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा देखील भारतीय ज्योतिष शास्त्राचा श्रेष्ठत्वाचा दाखला आहे. युद्धाची शक्यता सांगतांना त्या हिंदी पंचांगात म्हटले आहे की, “गोचर ग्रहस्थिति के अनुसार सूर्य शनि की स्थिति जनवरी, 2022 ई. से आगे संवत् 2078 वि. के अन्त या आगे तक 6 से 8 महीने की ग्रहस्थिति के अनुसार का मिथुन-प्रभावराशि देश अमेरिका के प्रभुत्व को क्षीण करेगी! एवं महाशक्ति की होड़ में ब्रिटेन, जर्मनी, फ्रांस, अमेरिका, उ. कोरिया, रूस के साथ चीन द्वारा विकसित शस्त्रास्त्रों के विरुद्ध आवाज उठेगी। परिणाम संघर्षात्मक स्थिति को जन्म देंगे। चीन, रूस, जर्मनी किंवा जापान आदि में परस्पर शस्त्रास्त्रों की होड़ से विश्वशान्ति भंग हो सकती है! लगभग 26 फरवरी 2022 ई. के बाद 7 अप्रैल, सन् 2022 ई. तक शनि मंगल का मकर राशि में योग यूरोपीय देशों की नीति विश्वव्यापी अशान्ति किंवा घोषित युद्ध का वातावरण बना सकती है।”
खऱ्या ठरणाऱ्या या भाकीतावरून बुद्धिवादी मंडळी काही बोध घेतील का ? असा प्रश्न सध्या केला जात आहे. खूप वाचता आले आणि खूप लिहिता आले की काहीजण स्वत:ला “सर्वज्ञ” झाल्याचे मानायला लागतात, अशातल्याच काही शहाण्यांनी पंचांग, कुंडल्या, ग्रह, नक्षत्रांचे परिणाम सरसकट नाकारणे व ज्योतिषशास्त्राला बदनाम करणे काही वर्षापासून चालवले आहे. लोकांच्या मनात असलेली श्रद्धा पुसणे चालवले आहे. अर्थात ग्रह-ताऱ्यांवरील श्रद्धेचा गैरउपयोग करून लुटमार करणाऱ्यांनी या शास्त्राकडे बघण्याचा दृष्टिकोन आधीच प्रचंड दूषित केला होता; हे वास्तव नाकारता येत नाही.
तथापि कोणताही सखोल अभ्यास नसतांना आणि अध्यात्माची कोणतीही अनुभूती घेतली नसतांना ज्योतिष शास्त्राला खोटे ठरवत आले, हे अत्यंत चुकीचे घडत आहे. काही ब्रिटिश कालीन समाजसुधारकांनी मांडलेले विचार; हेच अस्सल शास्त्र समजून
ग्रह, तारे आणि त्यांचे जीवनावरील परिणाम वगैरे असे काहीही नसते, असे सांगत टिंगल टवाळी करीत आले आहेत. एकीकडे नेस्ट्रेडँमसारख्या विदेशी भविष्य वेत्त्यांना डोक्यावर घ्यायचे दुसरीकडे भारतीय ज्योतिष शास्त्राला लाथाडायचे, असेही थोर अभ्यासकांकडून घडत आले आहे.
परंतु शास्त्र अखेर शास्त्र असते. नैसर्गिकरित्या त्याचे दाखले समोर येतातच.
एप्रिलनंतर जागतिक तणाव निवळेल ?
काही ज्योतिष पंडितांचे म्हणणे आहे की, युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेला तणाव हा शनि व गुरु सारख्या मोठ्या ग्रहांचा परिणाम आहे. 27 फेब्रुवारी 2022 ते 1 मार्च 2022 या कालखंडात मकर राशीत पंच अग्रह संयोग होत आहे. परिणामी तणाव वाढेल परंतु वैश्विक स्वरूप येणार नाही. 29 एप्रिलला शनि ग्रह कुंभ राशीत गेल्यावर आंतरराष्ट्रीय उपद्रव कमी होतील, असा अंदाज या पंडितांनी व्यक्त केला आहे. तथापि एप्रिल महिन्यात एकाच वेळी नवग्रहांमध्ये पालट होत आहेत याचा परिणाम होऊन जागतिक वातावरण ढवळून निघालेले दिसेल. अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धक्का संभवतो व चीन आणि रशिया यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता दिसते असेही भविष्य वर्तवण्यात आले आहे. या सर्व घडामोडीत भारताला कोणतीही मोठी हानी पोहोचणार नाही. भारतातील अंतर्गत अशांतता मार्च एप्रिल दरम्यान वाढत जाऊन नंतर संपुष्टात आलेली दिसेल, असाही अंदाज ज्योतिष पंडितांनी व्यक्त केला आहे. हे भाकीत खरे ठरते की खोटे, हे लवकरच पहायला मिळेल.