नंदुरबार : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने गेल्या दोन वर्षात नंदुरबार जिल्ह्यासह राज्यात राबविलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात लोककलांच्या माध्यमातून जनजागृतीची सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने राबविलेल्या विविध योजना सोप्या आणि स्थानिक भाषेत सांगितल्या की लोकांपर्यत लवकर पोहचतात. यासाठी कलापथकांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
युवारंग फाऊंडेशन, नंदुरबार, आप की जय बहुउद्देशिय संस्था, अंमलपाडा, जय आदिवासी जनजागृती मंडळ, लोय या कलापथकामार्फत जिल्ह्यातील 6 तालुक्यात कार्यक्रम सादर करण्यात येत असून 15 मार्च पर्यंत 63 कार्यक्रमांचे सादरीकरण बसस्थानक,तालुका मुख्यालयाचे गर्दीचे ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समित्या, गाव जत्रा, आठवडे बाजार, उपजिल्हा रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे, रेल्वे स्थानकांच्या बाहेरचा परिसर, आठवडे बाजार आदी ठिकाणी हे कार्यक्रम घेण्यात येत आहे.
या मोहिमेतंर्गत आज नंदुरबार तालुक्यातील दुधाळे, आष्टे, नांदर्खे, नवापूर तालुक्यातील खानापूर गावातील जामनपाडा, खोलविहीर, मोग्राणी तर तळोदा तालुक्यातील तळोदा,आमलाड व चिनोदा येथे कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येत आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या लोककला जागराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात येत आहे.
00000