नंदुरबार – उत्स्फूर्त भाव आणि निस्सीम सेवा यांची जोड देऊन सातत्याने केलेले छोटे कामही कधीकधी मोठ्या ध्येयाला नकळत साकारून जाते. याचीच प्रचिती नवापुर तालुक्यातील क्रीडाशिक्षक राजेंद्र साळुंखे यांना राष्ट्रध्वजाच्या साध्यासहजपणे केलेल्या सेवेतून मिळत असून त्यांची राष्ट्रध्वजाची सेवा आता मित्रांच्या चर्चेचा विषय बनली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, प्राध्यापक राजेंद्र साळुंखे हे मागील पंचवीस वर्षापासून राष्ट्रध्वजाची सेवा करीत आहेत. त्याचे स्वरूप असे की, स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन म्हटला की प्रत्येक शासकीय कार्यालयात ध्वज फडकवला जातो व मानवंदना दिली जाते. परंतु स्तंभावर ध्वज उभारणे ही विशिष्ट प्रक्रिया असते. मानवंदना संपल्यानंतर सायंकाळी ध्वज उतरवला जातो त्याचे देखील संकेत आणि नियम ठरलेले आहेत. उतरवलेला ध्वज जपून ठेवताना त्याची घडी कशी घालावी याचेदेखील शासनस्तरावरून मार्गदर्शक तत्व सांगितले गेले आहेत. यात एक जरी चूक झाली तरी शासकीय नियमांचा भंग केल्याचा किंवा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा ठपका संबंधितांवर येऊ शकतो. या मुळे बहुतांश ठिकाणी शक्यतो माहितगार व्यक्तीकडूनच हे सर्व करून घेतले जाते. प्राध्यापक राजेंद्र साळुंखे हे यातील जाणकार म्हणून ओळखले जातात. म्हणून जवळपास सर्व प्रमुख कार्यालयांमध्ये त्यांनाच पाचारण केले जाते. नवापुर तालुक्यातील शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे हे कार्यरत आहेत. कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे नवापुर तालुका उपाध्यक्ष आहेत. तरीही राष्ट्रभाव आणि राष्ट्रध्वजाची सेवा याचे महत्त्व जपून प्राध्यापक राजेंद्र साळुंखे हे नम्र भावाने प्रत्येक कार्यालयात जाऊन ही सेवा बजावतात. मागील पंचवीस वर्षापासून ही सेवा नियमितपणे करीत असल्याचे प्राध्यापक साळुंखे म्हणतात. सलग पंचवीस वर्षे अशी ध्वजसेवा देणारे ते विरळेच म्हटले पाहिजेत. कालच सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा झाला. त्याप्रसंगी सुद्धा त्यांनी ही सेवा दिली. त्यांचे वडिलही असेच सेवाभावी वृत्तीचे होते. साळुंखे यांचे कार्य सध्या चर्चेचा विषय बनला आहे.