राहूल गांधींचे वादग्रस्त वक्तव्य ‘डिसमेन्टलिंग हिंदुत्वा’चा भाग आहे ?

राहूल गांधींचे वादग्रस्त वक्तव्य ‘डिसमेन्टलिंग हिंदुत्वा’चा भाग आहे ?

(योगेंद्र जोशी)

हिंदू आणि हिंदुत्ववादी अशी स्वतंत्र अस्तित्वात नसलेली वेगवेगळी संज्ञा जाहीरपणे मांडून कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राहूल गांधी यांनी समस्त धर्मअभ्यासकांना धक्का(?)च दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे हिंदूप्रेमींची मने दुखावलीच शिवाय कॉंग्रेस नेते नेहमीच हिंदू धर्मावर प्रहार करण्यात समाधान मानतात व कॉंग्रेसचे नेतृत्व अजूनही खरे हिंदुत्व जाणून घ्यायला तयार नाही; ही लोकांची भावना पुन्हा दृढ झाली. आपल्याला हिंदुत्व मान्य असल्याचे म्हणायचे आणि त्याचवेळी अतिरेकी बुध्दीवादही करायचा, हा शुध्द दुटप्पीपणा आहे; अशी टिका यामुळे त्यांच्यावर होऊ लागली आहे. राहूल गांधी हे डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी उचलून धरलेला ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ चा अजेंडा राबवत आहेत का? अशीही शंका त्यांच्या या वक्तव्यांमुळे व्यक्त केली जात आहे.

बुध्दीवाद करण्याची ही राहूल यांची नसती उठाठेव कॉंग्रेस पक्षाला नुकसानकारक ठरू शकते, अशी चिंता काही कॉंग्रेसप्रेमींना  सतावत आहे. त्याच वेळी राहूल गांधी यांनी रुद्राक्ष माळ परिधान करण्यास कसा विरोध केला, याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तथापि राहूल यांच्या भगिनी स्वत: प्रियांका वाडरा यांनी राहूल यांच्या त्या वक्तव्यांचे जोरकसपणे समर्थन केले. त्यामुळे हा धुरळा पुढेही असाच उडत राहणार, हे आपोआपच स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राहूल यांनी हिंदू आणि हिंदुत्व असा भेद मांडल्याने देशभरात वादळ उठले आहे. राहूल गांधींच्या त्या वक्तव्याची री ओढून एक मोठा वर्ग सोशल मीडियावरुन ‘हिंदु आणि हिंदुत्ववादी’ हा अस्तित्वात नसलेला फरक मांडत आहे व चुकीच्या पध्दतीने धर्मचिकित्सा करीत धर्माची निंदा नालस्ती करण्यात धन्यता मानत आहे. एकार्थाने ते अज्ञानाचाच आनंद लुटत आहेत; असे हिंदुत्व जाणणाऱ्यांचे मत आहे.
यात विशेष असे आहे की, होऊन गेलेले भारतीय संत हे खरे हिंदू आणि त्या संतांना ज्यांनी सतावले ते हिंदुत्ववादी, छत्रपती शिवाजी महाराज हे खरे हिंदू आणि ज्यांनी त्यांच्या राज्याभिषेकाला नकार दिला ते हिंदुत्ववादी, असे अनेक उल्लेख जोडून अफाट आणि अचाट बुध्दीच्या राहुल समर्थकांनी ‘हिंदु आणि हिंदुत्ववादी’ यातील कथित फरक मांडणे सुरु ठेवले आहे. यावर हिंदू जाणकारांचे म्हणणे आहे की, खरे तर ‘हिंदूत्वनिष्ठ’ आणि ‘हिंदूद्रोही’ अशी फोड करता येऊ शकते. हिंदू संस्कृतीत सहिष्णूता, मानवता, विश्‍वबंधुता आणि ईश्‍वरनिष्ठ धर्माचरण या बरोबरच राष्ट्राभिमानही शिकवला जातो. त्याच्याशी जो जो प्रामाणिक नाही तो हिंदूद्रोही म्हटला जाऊ शकतो. हिंदू धर्माचे महत्व सांगायचा जो कोणी प्रयत्न करेल, त्याला धर्मवादी अथवा हिंदुत्ववादी संबोधून झोडपायचे, ही ब्रिटिशकालिन कुनिती आहे. या प्रकरणाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, राहूल गांधींचे म्हणणे ग्राह्य मानून हिंदुत्वाची चुकीच्या दृष्टीकोनातून मांडणी करायला मोठा हातभार लावणार्‍या ‘सोशल’ टोळ्यांमधील बहुसंख्य तरुण हे जन्माने हिंदूच आहेत. ही बाब धर्मप्रेमी संघटनांना चिंतन करायला लावणारी आहे. जन्माने हिंदू असूनही ते स्वधर्माची नालस्ती करण्यात धन्यता मानतात, हे चित्र काय दर्शवते? असा प्रश्न उपस्थित करून हिंदू धर्मातील मुलांना अजूनही स्वधर्माचा अभिमान, स्वधर्माचे ज्ञान आणि स्वधर्माचे आचरणमहत्व शिकवणारी प्रभावी व्यवस्था भारतात नाही, याकडे नर्देश केला जात आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण कालावधीत भारतात जी शिक्षणप्रणाली राबवली गेली, त्यातून कोणत्या विचारसरणीचे नागरिक निपजले; याचाही हा जीवंत आरसा आहे. काही ईतिहासकारांचे म्हणणे आहे की, भारतात संख्येने बहुल असलेल्या हिंदूंचे मर्म त्यांच्या धर्म शिकवणीत होते व ब्रिटिश हे जाणून होते. म्हणून ब्रिटिश राजवट असतांनाच हिंदूसंस्कृती रुजवणारे धर्मशिक्षण बाद केले गेले. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेस राजवटीत तेच सूत्र मागील पानावरून पुढे चालू राहिले. परिणामी मूळ अभ्यास नसतांनाही हिंदुत्वाची चिरफाड करणारे स्वयंघोषित अभ्यासक आज गल्लीबोळात पायलीचे पंधरा मिळतात. संदर्भांची मोडतोड केलेले आणि बुध्दीभेद करणारे ऐतिहासिक प्रसंग प्रसारित करण्याला सध्या उधाण आलेले दिसते ते यामुळेच. हिंदूप्रेमी यावर म्हणतात की, अब्जावधी रुपयांची रास बाळगणार्‍या हिंदू मंदिर संस्थानांनी धर्मशिक्षणाचे कवडी ईतकेही कार्य केलेले नाही, हे यानिमित्त पुन्हा समोर आले आहे. मंदिरांत साठणारे धन धर्मशिक्षण देण्याच्या कामात वापरले जाणार नाही, याची खबरदारी कायदे बनवणार्‍यांनी कायमच घेतली; हेही विद्यमान घटनाक्रम अधोरेखीत करून गेला आहेेे.
हिंदू धर्माचे व ईतिहासाचे गाढे अभ्यासक सत्चिदानंद शेेवडे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, योग आणि तत्सम विविध हिंदू संकल्पना जगात स्विकारल्या जाताहेत आणि त्यातून ‘वैश्‍विक हिंदुत्व’ आकाराला आले आहे. त्याला हाणून पाडण्यासाठी समस्त डाव्या संघटनांनी ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ राबवायला घेतले आहे. सत्चिदानंद शेेवडे यांच्या या म्हणण्याला सप्टेंबर 2021 मधे विदेशात पार पडलेल्या ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ परिषदेचा आधार आहे. ‘डिसमेन्टलिंग’ याचा मराठीत अर्थ होतो तुकडे पाडणे किंवा नष्ट करणे. जागतिक हिंदुत्वाचे तुकडे पाडणे, नष्ट करणे. याचा अर्थ सरळ स्पष्ट आहे की, तिकडे हिंदू संस्कृतीची महानता जगाच्या स्तरावर स्विकारली जात असतांना ईकडे भारतात मात्र धर्मावरुन गोंधळ माजवायचा. आधीच जातीपातीत आणि विविध पंथांमधे विभागल्या गेलेल्या हिंदू धर्मियांना बुध्दीभेदाचे अस्त्र वापरून आणखीन भ्रमीत करायचे व आपसात झगडायला भाग पाडायचे. शिवाय बुध्दीवादाने पछाडलेल्या हिंदुंच्याच हातून हिंदू धर्मियांची यथेच्छ चिरफाड करवून घ्यायची, असे षडयंत्र या ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्वा’मागे असू शकते. मग राहूल गांधी यांची हिंदुत्व विषयी चुकीची मांडणी करणे व वादग्रस्त विधान करणे तसल्याच ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’चा एक भाग असावे का? अशी हिंदूप्रेमींकडून व्यक्त होत आहे. ही शंका निराधार मानली तरी, त्यांनी तिकडे हिंदुत्वाविषयी चुकीची संदर्भहिन मते मांडली आणि ईकडे लगेच ते उचलून धरण्यासाठी प्रत्येक राज्यातून काही टोळ्या पुढे सरसावल्या. हा घटनाक्रम ‘डिसमेन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’चा भाग वाटाव्या अशाच आहेत. हे असेच जारी राहिले तर कॉंग्रेस पक्षाची मतपेढी वाढेल की घटेल? हे मात्र उत्तरप्रदेशातील होऊ घातलेल्या निवडणूकीच्या निकालातूनच पुढे समजू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!