रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या अनोख्या ‘भाऊबीज’मुळे दुर्लक्षित गरीब भगिनी आनंदल्या

 

नंदुरबार –  दुर्लक्षित गरीब मागास लोकांच्या सेवा वस्तीतील बहिणींना साडी-चोळी व दिवाळीचा फराळ भेट देऊन आगळी वेगळी सामाजिक भाऊबीज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती कडून नंदुरबार शहरात साजरी करण्यात आली. यामुळे गरीब वसाहतीतील अनेक भगिनींच्या चेहर्‍यावर भावाकडून मिळालेल्या भेटीचा व दीपोत्सवाचा खरा आनंद झळकला.

आज दिनांक  6 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या वतीने नंदुरबार शहरातील बंधारहट्टी, कंजर वाडा, खोडाई मता परिसर, गुरव चौक आदि परिसरातील विविध 9 सेवा वस्त्यांमध्ये जाऊन सामाजिक ही भाऊबीज साजरी करण्यात आली.  जनकल्याण समिती च्या नंदुरबार शहरातील कार्यकर्त्यांनी आजच्या कार्यक्रमासाठी पाच वेगवेगळे कार्यकर्ता समूह केले होते. सर्व समूहांनी आज सकाळी नऊ वाजता एकाच वेळी विविध वस्त्यांमध्ये जाऊन सामाजिक भाऊबीज कार्यक्रम साजरा केला. यावेळी शहरातील सेवा वस्तीतील 400 बहिणींना साडी-चोळी व फराळाचे साहित्य भेट स्वरूपात संघ बंधूंकडून देण्यात आले. यावेळी सेवा वस्तीतील बहिणींकडून संघ कार्यकर्त्यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी झालेल्या विविध कार्यक्रमात रा स्व संघ जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष जयकुमार वसावे, कोषाध्यक्ष पांडुरंग अण्णा माळी, देवगिरी कल्याण आश्रमाचे प्रांत सहसचिव वीरेंद्र वळवी, जनकल्याण रक्तपेढी चे संचालक विजय कासार, हेडगेवार सेवा समितीचे सचिव डॉक्टर नितीन पंचभाई, जनशिक्षण संस्थानचे गिरीष बडगुजर, संघाचे शहर संघचालक डॉक्टर त्र्यंबक भाई पटेल, शहर कार्यवाह भूपेंद्र चौधरी, सेवा सहयोगी डॉक्टर अशोकजी पाटील, विश्व हिंदू परिषदेचे एड. रोहन गिरासे, विद्यार्थी परिषदेचे शुभम स्वामी,  जनकल्याण समितीचे कार्यवाह उमेश शिंदे सहकार्यवाह संदीप निकम फकीरा माळी, मुकेश सोनवणे यांच्यासह संघ कार्यकर्ते सहभागी झाले होते.

One thought on “रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या अनोख्या ‘भाऊबीज’मुळे दुर्लक्षित गरीब भगिनी आनंदल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!