नंदुरबार – गांधीधाम-पुरी एक्स्प्रेसच्या जळालेल्या पँट्री कारमधे खानपान व्यवस्थेच्या कंत्राटदाराकडून गॅस सिलेन्डरचा बेकायदेशीर वापर केला जात होता, असे चौकशीसाठी येथे दाखल झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाला निदर्शनास आले असल्याचे समजते. रेल्वेत गॅस सिलेन्डर वापरणे कायदेशीर मोठा गुन्हा मानला जात असल्याने निदर्शनास आलेली बाब धक्कादायक मानली जात आहे.
यामुळे पँट्री कारला आग लागण्याला गॅस सिलेन्डर कारणीभूत ठरले असावे का? ही आगेची दुर्घटना सिलेन्डर स्फोटाचा प्रकार असावा का? या शक्यता पडताळून पाहिल्या जाणार आहेत, असे रेल्वे विभागातील सूत्रांकडून कळते.
गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस सुरतहून येऊन नंदुरबार स्थानकात प्रवेश करत असतांनाच पँट्री कारला आग लागल्याची घटना आज दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता घडली. हा प्रकार या डब्यातील रसोई व्यवस्थापकाच्या लक्षात आला तेव्हा नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाखाली असलेल्या सिग्नल क्रमांक एक जवळ ट्रेन पोहोचली होती. सावधानता बाळगत त्याने शेजारच्या वातानुकुलित डब्यात जाऊन चेेन ओढली व ट्रेन थांबवली. नंदुरबार स्थानकाला माहिती दिल्याने पुढील दुर्घटना आटोक्यात आली. तथापि वातानुकूलित रसोई यान म्हणजे पॅन्ट्री कार जळून खाक झाली. या संपूर्ण वातानुकूलित बंदिस्त डब्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. पँट्री कार म्हणजे वातानुकुलीत रसोई यान. या बंदिस्त डब्यात स्वयंपाकाचे काम चालते. त्यामुळे येथे शॉर्टसर्किटमुळे, इलेक्ट्रिक शेगडीमुळे, सिलेंडरमुळे की आणखी कशामुळे आग लागली ? पॅन्ट्री कार कशामुळे जळून खाक झाली ? असे प्रश्न रेल्वे अधिकाऱ्यांना पडले आहेत. याचे अधिकृत उत्तर चौकशीनंतरच मिळू शकणार आहे. यासाठीच तातडीने या घटनेची पाहणी करण्यासाठी मुंबई सेंट्रल रेल्वेचे प्रबंधक जी व्ही एल सत्यप्रकाश हे स्वतः नंदुरबार येथे आले. सायंकाळी 5.20 वाजता मुंबईहून वरिष्ठांच्या पथकासह ते नंदुरबार स्थानकात दाखल झाले. ॲडिशनल जनरल मॅनेजर, मंडल ऑपरेटिंग मॅनेजर, विशेष सुरक्षा अधिकारी आदींचा पथकात समावेेश आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जळालेल्या पॅन्ट्री कारची आतून बाहेरून पाहणी केली व संबंधित प्रत्यक्षदर्शीी कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. या दरम्यान एक गॅस सिलेन्डर पॅन्ट्री कारमधे आढळल्याचे बोलले जाते. तथापि तशी अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. रेल्वे डब्यातून तसेच रसोई यान मधून अथवा प्लॅटफॉर्मवरील स्टॉल मधून गॅस सिलेंडरचा वापर करण्यास सक्त मनाई आहे व तसे केल्यास कायदेशीर गुन्हा मानला जातो. तपासाचा भाग असल्यामुळे अद्याप खात्री केली जात आहे. जबाबदार अधिकारी नेमला जाऊन ही चौकशी पुढे केली जाईल व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई निश्चित केली जाईल असे संबंधित सूत्रांनी सांगितले आहे.



