नंदुरबार – शहरातील नळवा रोडवरील रेल्वे बोगद्याचे अनेक वर्षापासून रखडलेले काम एकदाचे मार्गी लागले आहे. परंतु हे काम सुरु करण्यासाठी कसे प्रयत्न केले, हे सांगणारे दावे प्रतिदावे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या समर्थकांमध्ये सुरू झाले आहेत. परिणामी पूर्ण होण्याआधीच बोगद्यातून श्रेयवादाची राजकीय एक्सप्रेस धावू लागल्याचे चित्र समोर आले आहे.
तिकडे रेल्वे प्रशासनात वेगाने फाईली फिरल्या आणि ईकडे शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेकडील पहिला 1 कोटी रुपयांचा डीमांड ड्राफ्ट रेल्वे प्रशासनाला अदा केला. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी बोगद्याचे काम सुरू झालेले सर्वांना पाहायला मिळाले. ताबडतोब कामाच्या ठिकाणी भेट देत चंद्रकांत रघुवंशी यांनी कामाला गती दिल्याचे दर्शवले. तथापि या कामाचा पाठपुरावा दिल्ली दरबारात खासदार डॉक्टर हिना गावित यांनीही अगोदरपासून चालवला असल्याने लगेच त्यांचे समर्थक पुढे आले. नगरपालिकेने ड्राफ्ट द्यायला उशीर केल्यामुळेच काम प्रलंबित राहिले, असे या समर्थकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या मुद्द्यावरून भाजपाचे नगरसेवक प्रशांत चौधरी, आनंद बाबुराव माळी, संतोष वसईकर, लक्ष्मण माळी, रेल्वे सल्लागार समिती सदस्य गोपीचंद उत्तमानी, दुर्गेश राठोड, भरत माळी यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यांनी सांगितले की, शहरातील नळवा रस्त्यावरील पुल नं. १८८ च्या बाजुला ‘रोड अंडर ब्रिज’ (अंडर बायपास)चे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत होते. त्यामुळे उड्डानपुलापलिकडील रहिवाशांना रहदारीच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते. खासदार डॉ. हिना गावित यांनी वारंवार याबाबतीत रेल्वेमंत्री व रेल्वेच्या मुंबई स्थित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या. या कामासंदर्भातील तांत्रिक समस्यांविषयी अधिकारी व ठेकेदार यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधले व लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न केले. शिवाय वेळोवेळी निधी उपलब्ध करुन दिला. मुंबईस्थित अधिकाऱ्यांनी मागील महिन्यात झालेल्या बैठकीत सदर काम ३१ मार्च अगोदर पूर्ण करण्याचे सांगीतले असून त्यामुळेच आता अंतिम टप्प्यातील काम सुरु झालेले आहे, असे खासदार डॉक्टर हिना गावित समर्थकांनी म्हणणे मांडले.
आता यावर प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या वतीने प्रतिदावा केला आहे. उशिरा म्हणजेच 8 वर्षानंतर खा. हिनाताईंनी नंदुरबारच्या अंडर बायपाससाठी प्रयत्न केले त्याबद्दल आम्ही शहराचा जनतेच्या वतीने ताईंचे आभार मानतो, असे उपरोधिकपणे नमूद करून त्यात म्हटले आहे की, 8 वर्षापूर्वी आमचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मागणीवरुन महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये 2 कोटी 96 लाख रुपयांच्या अंडर बायपासला मंजुरी दिली होती. अंडर बायपास मंजूर करुन घेण्यासाठी फक्त आणि फक्त चंद्रकांत रघुवंशीनींच प्रयत्न केले हे जनतेला माहिती आहे. रेल्वेला पहिला 1 कोटी रुपयांचा डीमांड ड्राफ्ट रघुवंशीच मुंबईला पिंगळे, अभियंत्यासह रेल्वेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन दिला. वेळोवेळी रेल्वे अंडर बायपासचा संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. रेल्वे अंडर बायपास सोडून बाकी सर्व कामे नंदुरबार नगरपरिषद करुन देईल याची लेखी हमी नंदुरबार नगरपरिषदेने रेल्वेला दिली. परंतु केंद्राच्या गतीमान सरकारमुळे व आपल्या अथक प्रयत्नाने • वर्षाच्या कामाला 8 वर्ष लागले व आता ते पूर्णत्वास येत आहे. आता हे काम श्रेयवादामध्ये न अडकवता पूर्ण होवू द्या, असे प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांनी म्हटले आहे.