नंदुरबार – तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन अधिकार्यांच्या पथकाने रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देत पाहणी केली. मजुरांना दिला जाणारा दर, चालू असलेली कामे, मजुरांचे कौशल्य अशा विविध अंगाने माहिती घेण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, सरदार सरोवर प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर यांनी काल दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी ही पाहणी केली. या पथकाने नंदुरबार तालुक्यातील म.गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरु असलेले रनाळे, कार्ली, कंढ्रे, मांजरे, तीसी, व खोक्राळे या गावात प्रादेशिक वनक्षेत्रपाल व सामाजिक वनिकरण विभागाचे वनक्षेत्रपाल यांच्याकडील सुरु असलेल्या व पूर्ण झालेल्या कामांची तपासणी केली. तेथील मजुरांना येणाऱ्या अडचणी संदर्भात मजुरांशी चर्चा केली. नरेगा अंतर्गत त्यांना मिळणाऱ्या मजुरीचे दर काय आहेत? ते आठवडयाला नियमीत मिळते का ? याबाबत खात्री केली. त्याचप्रमाणे मजुरांना मनरेगा योजना समजावून सांगितली.
ज्या मजुरांची जिल्हा कौशल्य योजने अंतर्गत मोबाईल रिपेरींग कोर्स, मोटार सायकल रिपेरिंग कोर्स इ. शिकण्याची इच्छा असेल अशा मजुरांची नांवे, मोबाईल नंबर, झालेले शिक्षण इत्यादी माहिती नोंदवून घेण्यात आली. ज्यावेळेस कौशल्य विभागाचे वर्ग सुरु होतील, त्यावेळेस जिल्हा कौशल्य अधिकाऱ्यांना ती माहिती देऊन अशा मजुरांना प्राधान्यांने शिक्षण दयावे, अशी समज दिली. रस्त्याच्या दुतर्फा सामाजिक वनिकण मार्फत सुरु असलेली वृक्ष लागवड व रेल्वे दुतर्फा वृक्ष लागवड याबाबतही संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा केली. झाडांची निगा राखणे, काळजी घेणे यावर मार्गदर्शन देण्यात आले.
सहा.अभियंता जे.ए.कोळी, रोहयो दक्षता पथकाचे एम.बी.चव्हाण, वनक्षेत्रपाल अधिकारी, सामाजिक वनिकरण, वनपाल एस.एम.धनगर, वनपाल संजय भाबड, संदिप वाडीले, तांत्रिक अधिकारी, वनरक्षक भुषण तांबोळी ग्रामरोजगार सेवक मांजरे व ग्रामरोजगार सेवक कार्ली, ग्रामरोजगार सेवक आदी उपस्थित होते.