लतादीदी स्वर्गस्थ झाल्या! भारताचा चैतन्यमयी दैवी स्वर हरपला.. राष्ट्रीय दुखवटा जाहीर

भारताच्या ख्यातनाम गायिका, गानसम्राज्ञी तथा भारताच्या गानकोकिळा भारतरत्न लतादीदी यांनी आज रविवार दि.6 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8.12 वाजता उपचार चालू असताना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारत सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून आज रविवार दिनांक 6 रोजी सायंकाळी शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 
लतादीदींचा स्वर प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला होता. त्यांच्या गायनाने प्रत्येक व्यक्तीचे भावविश्व समृद्ध बनवले आहे. लतादीदींचे गाणे आणि त्यातील स्वर शब्द जीवनाचा आधार बनले आहेत. अशा अर्थाने खरोखर त्यांचा स्वर म्हणजे दैवी स्वर होता. हा स्वर हरपल्याने गीत संगीत प्रेमींसोबतच सर्व भारतीयांवर जणू आघात झाला. भारताचे गीत संगीत चैतन्य हरपले, भारताचा एक चैतन्यमय सूर निमाला, भारताच्या संगीत क्षेत्राचा आत्मा हरपला, अशा शब्दात भारतभरातून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
समस्त भारतीयांच्या नव्हे तर जगातील गीत संगीत प्रेमींच्या हृदयावर अनेक दशकांपासून अधिराज्य गाजवणारी गायनसेवा त्यांनी बजावली.  हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून त्यांना ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात इ.स. १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून राहिली.
 त्यांचेे म्हणजे मंगेशकर परिवाराचे मूळ गाव धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ‘थाळनेर’ आहे.

त्यांनी जवळपास 1 हजार हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, विसाहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते. लता मंगेशकराना भारतीय कोकिळा (Indian Nightingale) म्हणतात. अशा या महान दैवी स्वर लाभलेल्या आत्म्याला शत प्रणाम आणि मनःपूर्वक श्रद्धांजली !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!