नंदुरबार :- नवापूर तालुक्यातील घोडजामणे येथील जनावरांमध्ये ‘लम्पी स्किन डिसीज’चा व्हायरस आढळला आहे. मानवास जनावरापासून ‘लम्पी स्किन’ होत नाही; तथापि प्रादुर्भावग्रस्त भागातुन जनावरांची वाहतूक व विक्री करु नये. रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेह 8 फुट खोल खड्डयात पुरावा; यासह अनेक सूचना पशूसंवर्धन विभागाने दिल्या आहेत.
पशूसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, या विषाणूंचे संक्रमण झाल्यानंतर 1 ते 2 आठवड्यांपर्यंत रक्तामध्ये रहात असून त्यानंतर शरीराच्या इतर भागामध्ये संक्रमण होते. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडुन चारा व पाणी दूषित होते व त्यातून इतर जनावरांमध्ये या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ जिवंत राहू शकतात. विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरात प्रादुर्भाव झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो. दुध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातुन व कासेवरील व्रणातुन रोगप्रसार होतो.
पुढे असेही म्हटले आहे की, मानवास जनावरापासून हा आजार होत नाही, परंतू शेतकऱ्यांनी जनावरे हाताळल्यानंतर हात साबणाने धुवून घ्यावेत.साथीच्या काळात किंवा नेहमीच सर्वांनी दुध उकळून प्यावेत, मांस शिजवून खावे. प्रादुर्भावग्रस्त भागातुन जनावरांची वाहतूक व विक्री करु नये. रोगग्रस्त जनावराचा मृत्यू झाल्यास मृतदेह 8 फुट खोल खड्डयात पुरावा. पशुपालकांनी लम्पी स्कीन डिसीज लक्षणे आढळल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचार करुन घ्यावेत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.