नंदुरबार- दुचाकीने जात असतांना कोणी हात दिला तर सहकार्याची भावना ठेऊन त्या वाटसरूला लिफ्ट देण्याचा माणुसकी धर्म जवळपास सगळेच निभावतात. परंतु एका दुचाकीस्वाराला हेच महागात पडले व धक्कादायक प्रसंगाला सामोरे जावे लागले. हा दुचाकीस्वार खाली लघुशंकेला उतरला अन ज्याला लिफ्ट दिली तोच दुचाकी घेऊन पसार झाला, अशी घटना प्रकाशा गावाजवळ घडली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिंदखेडा तालुक्यातील रहिवाशी महेश शिरसाठ हे खेतीयाकडून प्रतापपूरकडे जात असतांना शहादा तालुक्यातील प्रकाशा चौफुलीवर एका २० वर्षीय तरुणाने हात देऊन लिफ्ट मागितली. शिरसाठ यांनी त्यास मोटरसायकलवर बसवून घेतले. अमलाड परिसरातील पुलाजवळ आले असता त्याने लघुशंकेसाठी थांबायला सांगून खाली उतरला. म्हणून शिरसाठही लघुशंकेसाठी उतरले. याच दरम्यान, संधी साधून त्या तरुणाने लगेचच मोटरसायकल ताब्यात घेत सुरु करून पसार झाला. अशी फिर्याद यांनी शिरसाठ यांनी पोलिसठाण्यात दिली. गुन्हा दाखल करून आता पोलिस त्याचा शोध घेत आहेत.