वाचकांचे मत:
समाजव्यवस्था उत्तम आणि सुरळीत रहावी, यासाठी हिंदु धर्माने विवाह संस्थेचे काही नियम ठरवून दिले आहेत. विवाहबाह्य संबंधांना अनैतिक ठरवले होते. त्यामुळेच हा समाज लक्षावधी वर्षांपासून टिकून राहिला आहे. विवाहित असतांनाही ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये म्हणजे विवाह न करता पती-पत्नी यांच्याप्रमाणे रहाण्याची अनैतिक आणि पाश्चात्त्य पद्धतीला पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने वैध ठरवले आहे. विवाहबाह्य संबंधांना ‘व्यभिचार’ ठरवणारे भारतीय दंड संहितेचे कलम ४९७ हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवले होते. त्यामुळे विवाहित असतांना ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये रहाणार्या जोडप्याला सुरक्षा देण्यात काहीच चुकीचे नाही, असे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे. येथे सर्व स्तरांतील लोकांनी स्वःमीमांसा करण्याची गरज आहे. प्रत्येकजण असा स्वैराचार करेल तर भावी पिढीवर काय संस्कार होईल? भारतात विवाह संस्थेतील आपुलकी, प्रेम, विश्वास, संयम आणि सहनशीलता या गुणांमुळे सुदृढ, समाधानी आणि सात्विक समाजाची निर्मिती होते जी जगाच्या पाठीवर एकमेवाद्वितीय आहे. तेव्हा समस्त भारतीयांना नम्र आवाहन आहे की महान भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याचे दायित्व घेऊया. क्षणिक सुख आणि कायमस्वरूपी दुःख देणाऱ्या विवाहबाह्य संबंधापासून दूर राहूया.