वाचकांचे पत्र:
उशीरा सुचलेले शहाणपण !
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून त्यात वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. प्रतिवर्षी लाखो वारकरी शेकडो किलोमीटर अंतर केवळ श्री विठ्ठलाच्या ओढीने श्रद्धेने पायी चालत असतात. आषाढी वारी ही महाराष्ट्रातून भरणारी मोठी यात्रा असते. ‘आळंदी ते सोलापूर मार्गाचे चौपदरीकरण करा, धर्मपुरी फाटा ते पंढरपूर सहापदरी करा, वारकरी मार्गातील प्रत्येक पालखी तळावर मुक्कामासाठी ५० एकर भूमी आरक्षित करून ठेवा’, या आणि अशा अनेक मागण्या वारकरी गेली कित्येक वर्षांपासून करत आहेत; मात्र कुठल्याच शासनकर्त्यांकडून वारकर्यांच्या मागण्यांवर अंमलबजावणी झाली नाही. माणुसकीचा विचार की वारी मार्गावर पाणी, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधाही वारकर्यांना मिळत नाहीत. दोन्ही वारी मार्गांवर अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वारकर्यांसाठी स्वतंत्र मार्गांची अनेक वेळा फक्त घोषणाच झाली. महाराष्ट्रात विठ्ठल भक्तांसाठी काही करणार नसाल तर कोणासाठी करणार?
याच समवेत गेली ३५ वर्षे राज्यातील समस्त वारकरी भाविकांकडून ‘राज्यशासनाने प्रत्येक जिल्ह्यात एक ‘वारकरी भवन’ उभारावे’, अशी मागणी केली जात आहे. निधीची कमतरता असल्याचे कारण देत राज्यशासनाकडून नेहमीच या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात येतात. तेच शासन काही जिल्ह्यांमध्ये तत्परतेने ‘उर्दू भवन’ निर्माण करण्यासाठी आर्थिक तरतूद करते, हे दुर्दैवी आहे.
परंतु आता वारकऱ्यांसाठी झाडे लावण्यासह विविध कामांना शासन गती देणार असल्याचे वृत्त वाचायला मिळाले. केंद्र सरकारने वारकर्यांचे पाय भाजू नयेत, यासाठी विशिष्ट पद्धतीचा रस्ता बनवणे, पालखी मार्गाच्या दुतर्फा स्वच्छतागृहे उभारणे, वारकर्यांना विश्रामासाठी जागा उपलब्ध करणे, तसेच ‘ज्ञानेश्वरी’त उल्लेख केलेली झाडे राज्य सरकारच्या वतीने रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावणे, आदी सुविधा निर्माण करण्यात येणारा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण निश्चितच वारकरी संप्रदायाचा सन्मान करणारेच आहे.