नंदुरबार – वीररशैव लिंगायात गवळी समाजातील प्रथा व परंपरेनुसार मयत व्यक्तीचा दफनविधी केला जातो. परंतु या अंतिम विधीसाठी जमिन नसल्याने तालुक्यातील वावद येथील गवळी समाज विचित्र समस्येला सामोरा जात आहे. वावद ग्रामपंचायतीअंतर्गत गावठाण परिसरात यासाठी स्वतंत्र जमीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र राज्य वीरर्शैव लिंगायात गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारी देण्यात आले.
पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि तहसीलदार यांना हे संयुक्त निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की,वावद गावात गेल्या 70 ते 80 वर्षांपासून गवळी समाज वास्तव्यास आहे. मात्र अजूनही गवळी समाजाच्या दिवंगत व्यक्तींच्या अंतिम संस्कारासाठी आवश्यक दफनभूमी उपलब्ध नाही. समाजाच्या मालकीची हक्काची कुठलीही जागा नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. नंदुरबार शहरातील गवळी समाजाच्या हक्काची आणि स्वमालकीची स्मशानभूमी धुळे रस्त्यावरील सर्वे नंबर 286 असून त्याप्रमाणे वावद गावात देखील गवळी समाजाच्या स्मशानभूमी साठी स्वतंत्र जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे.
पंचायत समितीच्या सहाय्यक गट विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी हे निवेदन स्वीकारले. प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे सकारात्मक आश्वासन श्रीमती पवार यांनी शिष्टमंडळाला दिले. निवेदनावर गवळी समाज जिल्हाध्यक्ष गोपाल लगडे, कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे, संघटक राजेंद्र लगडे, अशोक यादबोले, हेमंत नागापुरे, प्रवीण लगडे, हेमराज लगडे, खंडू गवळी, संतोष गवळी, आदीसह वावद येथील गवळी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.