विक्रम स्थापित करणारा ‘विजय’

योगेंद्र जोशी

नंदुरबार- महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी 76 हजार 245 इतक्या मतांची आघाडी घेत एकूण 1लाख 55 हजार 190 मते प्राप्त करून दणदणीत विजय प्राप्त केला आहे. विरोधकांनी त्यांच्या घराणेशाहीवर रान माजवले असताना आणि अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत असतानाही त्यांनी मिळवलेली मते लक्षणीय असून त्यांच्या विकास कार्यावर मतदारांनी दर्शवलेला हा विश्वास असल्याचे मानले जात आहे.

डॉक्टर विजयकुमार गावित हे सलग सहा वेळा आमदारपदी निवडून आले आणि आता सलग सातव्यांदा त्यांनी विजय प्राप्त करून नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील विक्रम स्थापित केला आहे. सलग सात वेळा निवडून आलेले या मतदारसंघातील ते पहिले आमदार आहेत. 2009 ते 2014 हे पाच वर्ष आणि मागील अडीच वर्ष महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली. नंदुरबार जिल्हा निर्मिती घडवून आणण्यापासून या भागाच्या माथी लागलेला मागासपणाचा कलंक पुसण्यापर्यंतचा विकासात्मक बदल घडवण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. असे असताना व्यक्तिगत राजकीय वैर काढण्याच्या हेतूने आरक्षण, संविधान, जातीय समीकरणे, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यावर विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न करून पाहिला. तथापि स्वतः डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मात्र लाडक्या बहिणी सारख्या योजनांचे दिलेले लाभ तसेच विधानसभा मतदारसंघात व जिल्हा भरात सातत्याने केलेली विकास कामे यावर आधारित सकारात्मक प्रचार चालवला होता. एवढेच नाही तर विकास विरुद्ध भ्रष्टाचार,  विकास विरुद्ध नरेटीव; अशी लढाई जनतेच्या दरबारात उभी करण्यात डॉक्टर गावित यांना यश आले होते ज्यामुळे मतदारांनीच यावर भूमिका घेतली. त्या बळावरच त्यांना जनाधार लाभल्याचेही निकालातून पाहायला मिळाले.
दरम्यान आज मतमोजणी प्रसंगी पहिल्या फेरीपासून डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मतांची आघाडी राखली. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी यांना उमेदवारी देण्यात आली होती. तडवी हे काँग्रेसचे उमेदवार असतानाही शिंदे गटाचे बळ त्यांना पुरवण्यात आले होते. महाविकास आघाडीतील या अंतर्गत विरोधाला मोडीत काढण्यात डॉक्टर विजयकुमार गावित मात्र यशस्वी झाल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसून येते.  पहिल्या फेरीला दहा हजार आठशे मतांची डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आघाडी घेतली. त्यानंतर सातत्याने भर पडत गेली. पंधराव्या फेरी अखेर त्यांनी पन्नास हजाराची उंची गाठली. 19 व्या फेरी अखेर डॉक्टर विजयकुमार गावित यांना एक लाख 16 हजार 3007 मते मिळाली यात त्यांनी 54 हजार 221 मतांची आघाडी राखली. अखेरच्या 27 व्या फेरीनंतर 76 हजार 245 इतक्या मतांची आघाडी घेत एकूण 1लाख 55 हजार 190 मते प्राप्त करून दणदणीत विजय त्यांनी प्राप्त केला आणि सलग सातव्यांदा निवडून येण्याचा विक्रम स्थापित केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!