विरोधकांच्या हल्लाबोलमुळे नंदुरबार नगरपालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह

नंदुरबार – शहरातील वाढलेले अतिक्रमण, मालमत्ता कर वसुली आणि त्यावरुन चाललेले आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर गंभीर मुद्दे उपस्थित करीत विरोधकांनी चालवलेल्या हल्लाबोलमुळे नंदुरबार नगरपालिकेतील कार्यपध्दत प्रश्नांकित बनली आहे.
मालमत्ता कर माफ करावा या मागणीवरून सुरू झालेली वादावादी कर आकारणीतील कथीत भेदभावापर्यंत गेली. आता करवसुलीच्या रकमेतील कथित घोटाळासुध्दा चर्चेत आणला गेला आहे. अशात एकेक नगरसेवक आव्हान-प्रतिआव्हान देऊ लागलेत. एकंदरीत पालिकेतील राजकारण तापत जाणार, याची ही नांदी म्हटली जात आहे तर दुसरीकडे जनतेच्या मनात पालिकेतील कारभाराविषयी प्रश्न निर्माण होत आहेत.
तहसीलदार आले विरोधकांच्या निशाण्यावर
कर थकविणाऱ्यांविरुध्द दि.1 मार्चपासून मोहिम घेण्यात येईल, असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेतील बैठक घेऊन घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, पालिकेतील भाजपचे गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी 2 मार्च 2022 रोजी पत्रकार परिषद घेतली. भुयारी गटारी, अस्वच्छता व अन्यविषयी आरोप केले. लोकांना धमकावून जबरीने मालमत्ताकर वसूल केला जाणार असेल तर भाजपा जनतेसोबत रस्त्यावर उतरेल, असा थेट इशारा दिला. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पालिकेच्या बैठकीत उपस्थित राहणे व सक्तीने करवसुली करण्याविषयी आदेश देणे, यावर विजय चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला. नगरसेवक, नगराध्यक्ष अथवा आमदार यापैकी कोणतेही घटनात्मक पद चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडे नाही असे असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी करवसूलीविषयक बैठक घेऊन एकप्रकारे राजकीय भुमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. या पत्रकार परिषदेच्या आधी चौधरी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देऊन तहसीलदार थोरात यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
12 कोटींची वसुली 7 कोटी दाखवल्याचा आरोप
महाराष्ट्रात कोणत्या नगरपालिकेने कर माफ केला याचा पुरावा द्या, असे आव्हान माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिले होते. त्या संदर्भाने शिरिष चौधरी म्हणाले की, त्यांच्या घरातील संस्थांचा, कार्यकर्त्यांना चालविण्यासाठी दिलेल्या संस्थांचा मालमत्ता कर माफ होतो; हे ऊदाहरण पुरेसे नाही का?  सामान्य नागरिकांचा मात्र मालमत्ता कर माफ होऊ शकत नाही, हा दुजाभाव का? हा प्रश्न आहे.माहिती अधिकारात मागविण्यात आलेल्या माहितीनुसार २०१६-१७ मध्ये मालमत्ता कराची वसुली १२ कोटी ६८ लाख रुपये करण्यात आल्याचे म्हटले आहे. तर अर्थसंकल्पाच्या विगतवारीत ७ कोटी ७१ लाख रुपये वसुली म्हटली आहे. मग उर्वरित पैसा गेला कुठे ? याची चौकशी झाली पाहिजे; असे चौधरी यांनी सांगितले. अतिक्रमणाबाबत माजी आमदार रघुवंशी हे दुटप्पी भूमिका घेतात. आधी त्यांनी व त्यांच्या जवळच्या लोकांनी केलेले अतिक्रमण काढून दाखवावे व मगच शहरातील अतिक्रमणाबाबत त्यांनी बोलावे असेही माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.
पत्रकबाजीतून टोला-प्रतीटोला
 माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे यावर काय म्हणणे मांडतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तथापि प्रत्युत्तर म्हणून प्रभारी नगराध्यक्ष वसावे यांनी काल प्रसिद्धी पत्रक काढले. वसावे यांनी प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार यांच्या निलंबनाची मागणी अनाठायी असल्याचे नमूद करत म्हटले आहे की,
आमचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत बहुमत मिळवून सत्तास्थापन केली आहे. पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व चांगल्या-वाईट कामांची जबाबदारी आमची असल्याची जाणीव आहे. पालिकेने जर मालमत्ता कराची वसुली केली नाही तर भविष्यात शासनाकडून अनुदानसुद्धा पालिकेला मिळणार नाही आणि त्यामुळे आम्ही वसुलीसंदर्भात बैठक घेतली होती. रघुवंशी यांनासुद्धा त्यात मीच आमंत्रित केले होते, असे वसावे यांनी म्हटले. यावर्षी पालिकेची निवडणूक असल्याने जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू करून विकासकामांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा थेट आरोपही वसावे यांनी केला. अर्थातच वसावे यांच्या या प्रत्युत्तरामुळे पत्रकबाजीला तोंड फुटले आहे.
कारण लगेचच वसावे यांना उत्तर म्हणून भाजपाचे नगरसेवक निलेश पाडवी यांनी पत्रक काढले. वसावे यांचा ‘कठपुतली नगराध्यक्ष’ असा उल्लेख करून पाडवी यांनी म्हटले आहे की, पत्रकार परिषद घेऊन मालमत्ता कराचा भ्रष्टाचार पुराव्यानिशी उघड केला. परंतु त्यावर यांनी ब्र अक्षरही नमूद केले नाही. गरीब जनतेच्या मालमत्ता करातून वीज बील भरून छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात अनधीकृतरीत्या कार्यालय चालवले जाते, अशा आशयाचा आरोप करीत पाडवी यांनी पुढे म्हटले आहे की, अशांच्या मार्गदर्शनात शहरातील जनतेचे नळ कनेक्शन कापण्याची धमकी देणाऱ्या विद्यमान प्रभारी नगराध्यक्षांनी स्वत:च्या घराचा व सत्ताधारी नगरसेवकांच्या कुटुंबीयांचाही मालमत्ता कर आधी भरणा करावा. तसेच कुणाल वसावे यांनी स्वत:च्या घराची बांधकाम परवानगी जनतेसमोर दाखवावी, असे जाहीर आवाहन पाडवी यांनी केलेे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!