नंदुरबार – नंदुरबार येथील कन्यादान मंगल कार्यालयात व्हाईस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्हा या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक पहिले मराठी वृत्तपत्रकार थोर इतिहास संशोधक ज्ञानेश्वरीचे पहिले प्रकाशक व आद्य प्रवर्तक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रतिमा पूजनासह विमा पॉलिसीचे वितरण, पत्रकारांची आरोग्य तपासणी असे उपक्रमही घेण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ऑल इंडिया न्यूज असोसिएशनचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सूर्यभान राजपूत यांच्या हस्ते आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर होते.
व्यासपीठावर सचिव राकेश कलाल, कार्याध्यक्ष धनराज माळी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश सोनवणे, कन्यादान मंगल कार्यालयाचे संचालक संदीप चौधरी, उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी प्रास्ताविकातून व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्याची माहिती दिली. व्हॉईस ऑफ मीडिया सकारात्मक दृष्टीने पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा लढा देण्याच्या दृष्टीने काम करणारी संघटना आहे. पत्रकारांसाठी गृहनिर्माण निर्मिती करणे हा उद्देश या संघटनेचा आहे. नंदुरबारला काही वर्षांपूर्वीच पत्रकारांकरिता गृहनिर्माण सोसायटी झाली असती, परंतु काही कारणास्तव गृहनिर्माण सोसायटीचा विषयी लांबणीवर पडल्याने ती होऊ शकली नाही याची खंत दोरकर यांनी व्यक्त केली.
पत्रकारांच्या हितासाठी नवीन व्यासपीठ उपलब्ध होऊन संधी मिळाली आहे. त्यासाठी सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन वाईस ऑफ मीडिया च्या माध्यमातून सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी केले. कार्याध्यक्ष धनराज माळी यांनीही पत्रकारांना या संघटनेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवक्ता रवींद्र चव्हाण यांनी तर आभार सरचिटणीस राकेश कलाल यांनी मानले.
दरम्यान लायन्स क्लब नंदरबार आणि व्हॉईस ऑफ मीडिया नंदुरबार यांच्या विद्यमाने आयोजित पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर झाले. यावेळी पत्रकारांची आरोग्य तपासणी डॉ. नूतन शहा यांनी केली. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सतीश चौधरी, सचिव उद्धव तांबोळी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. नुतन शहा, डॉ. जयंत शहा अनिल पाटील, महेश देसाई, राहुल पाटील, आनंद रघुवंशी, आशिष शिंपी, रामेश्वर शिरसाठ आणि व्हॉईस ऑफ मीडिया नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.