विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय ठिकाणी आणि तालुकास्तरावरील असलेल्या न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात सरकारपक्षातर्फे केसेस चालविण्याकरिता मानधन तत्वावर अभियोक्ता यांची नामिका (पॅनल) तयार करण्यासाठी 7 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज करावयाचे आहेत.

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदासाठी अर्जदार भारताचा नागरीक असावा. अर्जदार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या विधी पदवीधर असावा. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचेकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी. एलएलएम असल्यास प्राधान्य देण्यात येईल. जाहिरातीच्या दिनांकास अर्जदारास उच्च न्यायालय किंवा त्याहून दुय्यम न्यायालयातील किमान 5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक राहील. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असेल. अर्जाच्या दिनांकास खुल्या प्रवर्गातील अर्जदाराचे वय 38 आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल 43 वर्ष राहील. तसेच राज्य शासनाच्या गृह विभागाकडील शासन राजपत्र 8 सप्टेंबर 2015 रोजीच्या सूचनेनुसार उक्त कायद्यातील तरतूदीच्या अनुषंगाने काम करीत असलेल्या व्यक्तींना उच्च वयोमर्यादा 45 वर्ष व्यतिरिक्त अन्य कोणतीही सुट राहणार नाही.

सदर पदे ही फौजदार प्रक्रिया संहिता कलम 25(3) अन्वये निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात मानधन तत्वावर आहेत. या निवड प्रक्रियेमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना या निवडीच्या आधारावर भविष्यात स्थाई शासन सेवेत घेण्याचा अधिकार राहणार नाही व त्याबाबतचे कोणतेही विनंती अर्ज विचारात घेण्यात येणार नाही. सदर पदाची नेमणूक ही तात्पुरत्या स्वरुपाची असून विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यापदावर नियमित नेमणूक झाल्यास किंवा काम करीत असलेले न्यायालय बंद झाल्यास त्यांची नेमणूक आपोआप रद्द करण्यात येईल. या नियुक्त्या नियमांमधील तरतुदींच्या अधीन राहून कोणत्याही वेळी, कोणतीही पूर्वसूचना न देता संपुष्टात आणल्या जावू शकतील.

विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांना नंदुरबार शहर किंवा नंदुरबार जिल्ह्यातील तालुकाक्षेत्रातील न्यायालयात ज्या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल ते ठिकाण बंधनकारक असेल. काम केलेल्या दिवशीचे मानधन देय ठरेल. ज्या‍दिवशी काम नसेल त्या दिवशी मानधन देण्यात येणार नाही. प्रतिदिन परिणामकारक सुनावणीसाठी रुपये 600, एका जामीन अर्जांच्या विरोधाकरीता रुपये 400 तर प्रतिदिन एकूण कमाल मर्यादा रुपये 1000 इतकी असेल.

अर्जातील चुकीची माहिती किंवा कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक आढळल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल. सदर नियुक्ती उमेदवारांच्या मुलाखती घेऊन केल्या जाणार असल्याने अर्जाच्या छाननीअंती मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल. सदर पदाची नेमणूक संचालक, अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्या अधीन राहून करण्यात येईल.

पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी त्यांचे विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रे साक्षांकित प्रती जोडून आपले अर्ज 7 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता, 3 माधव कृपा बिल्डींग, एल.आय.सी कार्यालयासमोर माणिक नगर, ता.जि.नंदुरबार येथे दोन प्रतीत सादर करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष विशेष सहायक सरकारी अभियोक्ता निवड समिती नंदुरबार मनीषा खत्री यांनी केले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!