वीज बिलात ईतके विविध ‘भार’ आणि ‘आकार’ का असतात ?

  “आकार” “दर” “भार” या विविध स्वरूपातील वीजबिलात लागून येणारी आकारणी कशासाठी केली जाते ? हा प्रश्न प्रत्येक वीज ग्राहकाला नेहमीच पडत असतो. तांत्रिक कारणांच्या नावाखाली सामान्य जनतेची लूट करण्यासाठी हे रकाने ठेवले आहेत काय ? हा संतप्त प्रश्नही नेहमीच उपस्थित केला जातो. सोशल मीडियातून दर काही दिवसांनी यावर संतप्त चर्चा झडतात. परंतु वीज बिलातील या विवरणाचा नेमका अर्थ काय? हे सविस्तर सांगितले जात नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार विविध रकाने दाखवून रक्कम लुबाडले जाते हा समज चुकीचा असून बील आकारणी कशावर आधारित आहे, हे प्रत्येकाला कळावे यासाठी व पारदर्शकता ठेवण्यासाठीच हे विवरण दिलेले असते.
सध्या सोशल मीडियात पुन्हापुन्हा एक संदेश फिरत आहे. हा संदेश असा : महावितरणमध्ये काम करणारा एक अधिकारी दाढी करण्यासाठी सलूनमधे गेला. तेव्हा  सलूनवाल्याने लावलेला रेटबोर्ड वाचून चक्रावला. कारण बोर्डवर लिहिलेले असते –
दाढी – फक्त ₹. १०/-
ब्लेड अधिभार – ₹. २/-
वस्तरा भाडे – ₹. ३/-
क्रीम – ₹. ५/-
कात्री भाडे – ₹. ३/-
खुर्ची भाडे – ₹. १०/-
लोशन – ₹. ७/-
पावडर – ₹. ५/-
नॅपकिन भाडे – ₹. ५/-
——————————–
एकूण – ₹. ५०/-
बोर्ड वाचून अधिकारी विचारतो, “तुम्ही तर कमालच केलीत. दाढी फक्त १० रु. लिहून इतर छुपे खर्च लावून ग्राहकांची लूट करताय.“  त्यावर तो दुकानदार म्हणतो “हा बोर्ड मोठ्या अक्षरात आणि शुद्ध मराठीत असल्याने तुम्हाला वाचता तरी येतो साहेब. तरीही, तुम्ही मला जाब विचारताय? तुमच्या महावितरणकडून अनेक वर्षांपासून आमची महा-फसवणूक सुरू आहे त्याचं काय?
स्थिर आकार,
वीज आकार,
वीज वहन आकार,
इंधन समायोजन आकार,
वीज शुल्क
वीज विक्री कर,
व्याज,
इतर आकार,
चालू वीज देयक,
थकबाकी,
समायोजित रक्कम,
व्याजाची थकबाकी,
एकूण थकबाकी,
देयकाची निव्वळ रक्कम,
…. पूर्णांक देयक…
हे विज बिल आजपर्यंत किती जणांना कळले ते सांगाल का?”…
सामान्य ग्राहकांच्या भावना, रोष या संदेशात प्रतिबिंबित आहेत. जर “आकार” “दर” “भार” एवढी आकारणी कशासाठी ? हा संतप्त प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. यावर समाधान कारक उत्तर मिळावे ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. मात्र यावर नेहमीच तांत्रिक स्पष्टीकरण देऊन ग्राहकांना टोलवले जाते आणि ती तांत्रिक कारणे सामान्य जनतेला अजिबात पटत नाहित. परिणामी रोष कायम आहे.
महावितरणचे हे आहे स्पष्टीकरण:
दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना महावितरणचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानेश्वर अर्दाड यांनी म्हटले आहे की, आपण जेव्हा बाजारातुन कोणतीही एखादी वस्तू खरेदी करतो तेव्हा त्या वस्तूच्या दरात बऱ्याच गोष्टीचा समावेश असतो व त्यानंतरच त्याची किंमत MRP म्हणून ठरत असते व ती वस्तू आपण त्याच किमतीने कोणताही मोल भाव न करता विकत घेतो…
परंतु त्या वस्तूवर लावलेल्या विविध गोष्टीचा दर  मात्र लिहिलेला नसतो, यामद्धे त्यांनी दर ठरवायचं आणि आपण ती किंमत मोजायची अशीच देवाणघेवाणी ची रीत चालते. त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण 10  रुपयांची मूळ किंमत असलेली वस्तू 20 रुपयाला सुद्धा इतर आकारांच्या मोजणी मुळे घेऊन येतो आणि आपल्याला त्याबद्दल काहीही माहिती सुद्धा नसते.
परंतु mseb मध्ये विजेचे दर निश्चित करताना बऱ्याच तांत्रिक बाबींचा सारासार विचार करून प्रत्येय घटकांशी निगडित असलेल्या व्यक्तीनुसार सर्व आकारांचा समावेश करून, स्वतंत्र आयोगातर्फे दर निश्चित केले जातात. त्यामुळेच हा दर, वस्तू जरी एकच असली तरी त्याचे दर व्यक्तीनुसार व त्याच्या वापरण्याच्या प्रकारानुसार वेगवेगळे निश्चित केले जातात.
म्हणूनच BPL खाली असलेल्या व्यक्तीला त्याचा दर हा खूपच कमी असतो, त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी च्या नियमानुसार शेतकऱ्यास किंवा कुक्कुट पालन यांना खूपच अल्प दरात वीज पुरवठा केला जातो, सार्वजनिक पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट यांना सुद्धा कमी दरात वीज पुरवठा करण्यात येतो, या व्यतिरिक्त सर्व सामान्य जनतेसाठी असलेल्या सुविधा पुरविणारे govt हॉस्पिटल, किंवा इतर कार्यलये यांना सुद्धा वेगळ्या दराने वीज पुरविण्यात येते आणि ही घकानुसार दर निश्चिती ही सामान्य जनतेसमोर झालेल्या आयोगाद्वारे घेतलेल्या सुनावणी मधील निर्णयानुसार घेऊन केली जाते व त्यात सामान्य जनतेने मांडलेल्या सूचना व शिफारशी लक्षात घेऊनच केली जाते.
महावितरण जेव्हा आपणास वीज देते तेव्हा ही वीज स्वतः mseb बनवत नसून विविध स्तोत्रातून निर्मिती झालेली वीज पारेषण कंपनी मार्फत आपल्या गावात आणुन ती घरोघरी वितरीत केली जाते…,
त्यामुळे mseb ला ती जरी ₹6.50 दराने प्रति युनिट विकत घ्यावी लागत असली तरी वितरित करतांना मात्र त्याच दराने mseb ला करता येत नाही, कुणाला ती ₹1.10 तर कुणाला  ₹ 2.05 दरानुसार सुद्धा द्यावी लागते…
सदर वीज बिल आपणास वितरित करतांना आपणास लावलेल्या विजेच्या एकूण दरात पारदर्शता यावी या करिता हे दर आयोगाच्या अधिनियमा नुसार प्रत्येक बिलावर नमूद केले जातात, …..नव्हे ते नमूद करणे mseb ला बंधनकारकच आहे.
परंतू या विषयाबाबत कोणतीही कल्पना नसल्याने किंवा कोणताही अभ्यास न करता काही लोक वीजेच्या दराची तुलना दाढीच्या दरा सोबत किंवा केळ्याच्या विक्रीसोबत करणारा मेसेज* तयार करून फोरवर्ड करीत आहेत. परंतु सत्यपरिस्थिती अशी आहे की प्रत्येक वीज ग्राहकाला आपल्याला लावलेले वीज बिल हे कोणकोणत्या घटकांच्या मोजनीनंतर तयार करण्यात येते याबद्दल आपणास संपूर्ण माहिती तुमच्या वीज बिलावर नमूद करून आपणास अवगत असावी त्यासाठी हा सर्व खटाटोप असतो…
याबाबत अधिक माहिती करिता जास्तीत जास्त सुज्ञ लोकांनी आयोगाच्या वीज दर निच्छिती बद्दल माहिती घेऊन, स्वतः दर निच्छिती प्रक्रियेत सहभागी होण्याची गरज आहे व आपल्याला वीज बिलाच्या बाबतीत असणाऱ्या शंका आयोगाच्या समोर मांडण्याची गरज आहे.
आपण याबद्दल सविस्तर व सखोल,अधिक माहितीसाठी महाराष्ट्र वीजनियामक आयोगाच्या संकेतस्थळावर व महावितरण च्या संकेत स्थळावर नक्की भेट द्या*  व प्रक्रिया कशी व का असते हे सुद्धा समजून घ्या म्हणजे आपल्या मनातील शंका दूर होतील* व दर संकेतांच्या पारदर्शकतेबद्दल आपणास समजून येईल. आणि सर्वात शेवटी… महावितरण ही शासनाची कंपनी असून सर्वसामान्य जनतेच्या सोई,सुविधेसाठी, हितासाठीच कार्यरत  आहे, असेही ज्ञानेश्वरअर्दाड यांनी म्हटले आहे.
वीज बिलावरील विवरणाचा असा आहे अर्थ:
१. स्थिर आकारनियामक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक वर्गवारीसाठी ठराविक स्थिर आकार घेतला जातो. एखाद्या महिन्यात वीज वापर जरी शून्य असला तरी स्थिर आकार भरावा लागतो. घरगुती जोडणीसाठी प्रतिमाह ५५ रुपये स्थिर आकार आहे.
२. वीज आकारवापरानुसार तो ठरत असतो. जेवढे युनिट वीज वापरली जाते, त्या युनिटची त्या-त्या टप्प्यानुसार वीज आकारणी केली जाते. उदा. घरगुती वीज वापर १०२ युनिट असेल तर चालू दरानुसार पहिल्या शंभर युनिटचे २.९८ रु. प्रमाणे २९८ रुपये व पुढील दोन युनिटचे ६.७३ रु. प्रमाणे १३.४६ रुपये असे मिळून ३११.४६ रुपये (२९८+१३.४६ ) इतका वीज आकार होतो.
३. वहन आकारही नवीन संकल्पना असून नियामक आयोगाने अस्थिर आकारांची (वीज आकार, इंधन समायोजन आकार इ.) विभागणी करून व्होल्टेजवर आधारित वहन आकार ठरवले आहेत. पूर्वी ते एकत्र होते, आता फक्त त्याची विभागणी झाली आहे. लघुदाबासाठी प्रतियुनिट १.१८ रुपये इतका वहन आकार असून १०२ युनिट वापरास तो १२०.३६ रुपये होतो.
४. वीज शुल्कस्थिर आकार, वीज आकार व वहन आकार यांच्या एकत्रित रकमेवर ठराविक वीज शुल्क आकारले जाते. घरगुतीसाठी त्याचे प्रमाण १६ टक्के, वाणिज्यिकला २१ टक्के तर औद्योगिकला ९.३० टक्के आहे. कृषीपंपाला वीज शुल्क आकारले जात नाही.
तत्पर देयक भरणा सूटसाधारणपणे देयक तयार झाल्यापासून दहा दिवसांत वीजबिल भरल्यास जवळपास १ टक्के इतकी सूट दिली जाते. महसूल वेळेत मिळावा तसेच वेळेत बिले भरणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागील उद्देश आहे.
सामान्य ग्राहकांना हे स्पष्टीकरण कितपत पटेल हा मात्र प्रश्‍नच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!