नंदुरबार – १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा आपल्या देशातही मोठ्या प्रमाणात रूढ झाली आहे. ज्या व्हॅलेंटाईनला ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप यांनीच ‘या नावाचा कोणी संत नाही’, असे सांगून रोमन दिनदर्शिकेतून कधीच हटवले आहे, त्याच्या नावाने भारतात ‘प्रेम दिवस’ साजरा करणे, हे दुर्दैवी आहे. ‘प्रेम दिवस’ म्हणून ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करू नका आणि लैंगिक अत्याचारांपासून स्वतःच्या पाल्यांना वाचवा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने निवेदनाद्वारे केले आहे. समितीच्या वतीने ..जिल्हाधिकारी ,पोलिस अधीक्षक,शिक्षण अधिकारी तसेच शहरातील शाळा व महाविद्यालय याच्या प्राचार्य व मुख्याध्यापक असे ११ ठिकाणी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, समिती या दृष्टीने शाळा-महाविद्यालयांत व्याख्याने देणे, पत्रकांचे वितरण करणे, शासनाकडे निवेदन देणे, सामाजिक प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसार करणे आदींद्वारे जागृती करत आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करून आपण पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करत आहोत. हिंदूंचे सण हे नैतिकता आणि सदाचार शिकवतात. आपली समृद्ध संस्कृती सोडून अन्य धर्मातील प्रथा-परंपरांचे पालन करणे, हे एकप्रकारे आपले मानसिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या धर्मांतरच नव्हे का ? यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ची कुप्रथा रोखा अन् हिंदु संस्कृतीनुसार आचरण करा’, असे आवाहन समितीने केले आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ला विरोध करण्याची कारणे
१. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याच्या नादात एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी अपराध घडतात; तसेच मद्यपान, धूम्रपान, अमली पदार्थांचे सेवन आदीही वाईट कृत्ये केली जातात. हे अत्यंत गंभीर आहे.
२. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ७ ते १४ फेब्रुवारीच्या कालावधीत गर्भनिरोधाच्या (कंडोमच्या) विक्रीमध्ये २० ते २५ टक्के वाढ होते, तसेच गर्भनिरोधक औषधे आणि गर्भधारणा तपासणी संच (प्रेंग्नन्सी टेस्ट कीट) यांच्या विक्रीतही वाढ होते, याव्यतिरिक्त लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे, अल्पवयीन मुलींवर अत्याचार होणे, कुमारीमाता बनणे आदी गंभीर समस्याही निर्माण होत आहेत.
देशात महिलांवरील अत्याचारांत होणारी प्रचंड वाढ पाहता या दुष्परिणामांकडे अत्यंत गांभीर्याने पाहायला हवे !
३. हिंदु संस्कृती ही सर्व प्राणीमात्रांवर सदासर्वकाळ प्रेम करण्यास शिकवते, तर ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘फ्रेंडशिप डे’, ‘व्हॅलेंटाईन डे’ हे एका दिवसापुरते प्रेम करायला शिकवतात. यातून युवापिढी व्यापक न होता संकुचितच होत आहे.
४. ‘व्हॅलेंटाईन डे’चे स्तोम वाढण्यामागे विदेशी आस्थापने आहेत. युवापिढीला आकर्षित करण्यासाठी गुलाबाची फुले, हृदयाच्या आकाराचे लाल फुगे, चॉकलेट, भेटवस्तू आदींद्वारे मार्केटिंग करून गल्ला भरला जातो, हे समजून घ्यायला हवे.
५. रशिया आणि अमेरिका खंडातील काही देश, तसेच चीन, इटली, स्वीडन, नॉर्थ कोरीया, इथियोपिया आदी देशांत हा दिवस साजरा केला जात नाही; तर पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, मलेशिया या इस्लामी देशांत व्हॅलेंटाईन डे साजरा केला, तर कडक शिक्षांची तरतूद आहे. मग ‘आपण हा दिवस का साजरा करत आहोत’, याचा विचार करायला हवा !
६. प्रेम आणि वासना यांतील अंतर हिंदु संस्कृती सांगते, तर वासनेलाच प्रेम समजणारी पाश्चात्त्यांची परंपरा आहे. ही शिकवण आज या दिवसाच्या माध्यमातून भारतीय युवापिढीत वाढत चालली आहे. जी अत्यंत घातक आहे.
या सेवेत हिंदु जनजागृती समिती चे सतीश बागुल राहुल मराठे व धर्म प्रेमी गौरव धामणे आकाश गावित जितेंद्र मराठे चेतन पाटील यांचे सहकार्य लाभले .