थिरूवनंतपूरम् (केरळ) – शबरीमला मंदिराच्या ‘अरावणा’ आणि ‘अप्पम्’ हा प्रसाद बनवण्यासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर केला जात असून या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयानेही दखल घेतली आहे.
‘हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ ‘इस्लामनुसार वैध’ असा आहे. मूलतः मांसाच्या संदर्भातील ‘हलाल’ प्रमाणपत्राची मागणी आता शाकाहारी खाद्यपदार्थांसह सौंदर्यप्रसाधने, औषधे, रुग्णालये, गृहसंस्था अशा अनेक गोष्टींत केली जात आहे. त्यासाठी हलाल इंडिया, जमियत उलेमा-ए-हिंद सारख्या इस्लामी संस्थांना शुल्क देऊन त्यांच्याकडून ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक केले गेले आहे. सेक्युलर भारतात सरकारच्या ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’ म्हणजे (FSSAI) कडून प्रमाणपत्र घेतल्यावर हे खाजगी इस्लामी प्रमाणपत्र घेण्याची सक्ती का ? असा देशभरातून ऐरणीवर आला असताना शबरीमाला मंदिरातील हे प्रकरण चर्चेत आले आहे.
दैनिक सनातन प्रभात मधून प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले आहे की, शबरीमला मंदिराच्या ‘अरावणा’ आणि ‘अप्पम्’ या प्रसाद बनवण्यासाठी ‘हलाल’ गुळाचा वापर केला जात आहे. या प्रकरणी केरळ उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मंदिराच्या मुख्य पुजार्यांना याविषयी त्यांचे मत मांडण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक एस्.जे.आर. कुमार यांनी मुख्य पुजार्यांचे मत जाणून घेण्याची मागणी केली होती. मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्या ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्डा’ने यापूर्वी न्यायालयात सांगितले होते की, प्रसादामध्ये जो गुळ वापरला जातो, त्याच्या पाकिटावर ‘हलाल’ असे लिहिण्यात आले असून हा गुळ अरब देशांमध्ये निर्यात केला जातो. अशा गुळाचा वापर यंदाच्या वर्षापासून करण्यात येत आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये या गुळाची चाचणी केली असता, तो मनुष्याला खाण्यायोग्य नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याचा लिलाव करण्यात आला. प्राण्यांचे जेवण बनवण्यासाठी हा गूळ एका आस्थापनाला देण्यात आला आहे.