नंदुरबार – सत्ता असतांना विकास कामे करणे सोपे असते. मात्र सत्ता नसतांना साम्राज्य उभे करणे कठीण काम आहे. विरोधात काम करतांना अनेक अडचणी येतात.सहकारमहर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील यांनी सतत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात राहून परिसराचा विकास घडवून आणला. त्यांचे कार्य समाजाला दिशा देण्याचे होते. आपणही नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून भविष्यातही सर्व सामान्य माणसाच्या उन्नती साठी कार्यरत राहणार आहोत,असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार जिल्हा ना. डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील सरदार पटेल सभागृहात आयोजित जाहीर नागरी सत्कार समारंभ प्रसंगी ते मनोगत व्यक्त करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहादा-तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी होते. यावेळी प्रमुख उपस्थिती खा. डॉ. हिनाताई गावित, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, पूज्य साने गुरुजी मंडळ विद्या प्रसारक मंडळाच्या सचिव श्रीमती कमलताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य जयश्रीताई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील सखाराम पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजाराम तुकाराम पाटील, शहादा तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रवींद्र रावळ, माजी पंचायत समिती सभापती माधव जंगु पाटील, दूध संघाचे माजी सभापती उद्धव पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रेमसिंग आहेर, रिपाईचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, रिपाईचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख अनिल कुवर,मंदाण्याचे उपसरपंच अनिल भामरे, विनोद जैन,रमाशंकर माळी, प्रा.लियाकतअली सैय्यद, माजी नगराध्यक्ष विजय दामू पाटील, प्राचार्य महेमुद खाटीक यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
ना. डॉ. विजयकुमार गावित सत्काराला उत्तर देतांना म्हणाले, सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील यांनी सहकारातून परिसराचा विकास घडवून आणला. यातून त्यांचे अष्टपैलूत्व सिद्ध होते. त्यांनी परिसरात सहकाराचे जाळे निर्माण करून सर्वसामान्यांना ताकद दिली. हाती घेतलेले कोणतेही काम असो ते पूर्ण करण्याची धमक त्यांच्यात होती. स्वर्गीय अण्णासाहेबांनी स्थलांतर रोखण्याचे कार्य फार पूर्वीपासून केले आहे.त्यांनी स्थानिक ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देत स्थलांतर होऊ नये याची काळजी घेतली. आपणही राजकारणात त्यांच्या मार्गदर्शनाने सक्रिय राहिलो आहोत.
डॉ. गावित पुढे बोलतांना म्हणाले, स्वर्गीय अण्णा साहेबांचे तापी-नर्मदेचे पाणी शेतीत आणण्याचे स्वप्न होते. उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न आहेत.बॅरेज व धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करून 70 ते 80 टक्के सिंचन करण्याची योजना आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या विकास घडवून आणण्याचे आपले ध्येय आहे. परिसराचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत कार्यरत राहू. शेती,उद्योग, मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण पक्ष विरहित कार्य करण्यास प्राधान्य देत असून कोणत्याही विकास कामाला विरोध होऊ नये याची काळजी घेऊ.या परिसरातील समाजाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करत उभे करण्याचे काम स्वर्गीय अण्णासाहेबांनी केले आहे. शिक्षणाची व्यवस्था स्थानिक ठिकाणी झाल्यानेच ग्रामीण भागातून परदेशात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण व नोकरीसाठी जाण्याचे प्रमाण शहादा तालुक्यातून अधिक आहे. ते म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील जनतेने आपल्यावर विश्वास टाकला आहे.या विश्वासाला जबाबदारीने पूर्णत्वास नेऊन समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी स्वर्गीय अण्णा साहेबांनी दाखवलेल्या मार्गाने आपलेही मार्गक्रमण राहील.
अध्यक्षीय समारोप आ. राजेश पाडवी यांनी केला.
खा.डाॅ.हिनाताई गावीत, दीपकभाई पाटील यांचीही भाषणे झाली. यावेळी शहादा शहर व तालुक्यातील विविध सहकारी संस्था, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींच्या वतीने ना.डाॅ. गावित यांचा नागरी सत्कार करण्यात आला.