नंदुरबार – ग्रामपंचायत प्रभाग रचनेचे दिलेले कामकाज करण्यास टाळाटाळ करीत आदेशाचे उल्लंघन करणे शाखा अभियंत्याला चांगलेच महागात पडले असून या अभियंत्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
अधिक वृत्त असे की, नंदुरबार तालुका पंचायत समिती येथे कार्यरत असलेले शाखा अभियंता ई.जी. भामरे यांना दि. ०६ / १२ / २०२ १ रोजी ते दि.१३/१२/२ ०२१ श्रीरामपुर व सुतारे गावाचे ग्रामपंचायत प्रभाग रचनेचे कामकाज सोपविण्यात आले होते. तथापि ते वेळेत पूर्णण करण्यात आले नाही. याविषयी नायब तहसीलदार भीमराव बोरसे यांनी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यात म्हटले आहे की, शाखा अभियंता भामरे हे शासकिय कर्मचारी असून त्यांना श्रीरामपुर व सुतारे गावाचे ग्रामपंचायतीचे प्रभाग रचना दिलेले कामकाज करण्याचे सकारात्मक प्रतिसाद दिला नाही व काम करण्यास टाळाटाळ करुन महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोग यांच्या आदेशाचे व जिल्हाधिकारी तसेच तहसिलदार यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. म्हणून लोक प्रतिनिधी अधि. १९५० प्रमाणे कलम १३४ (१) निवडणुक ४८१/२०२१ अनुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पोसई सोनवणे हे अधिक तपास करीत आहेत.