नंदुरबार – कोणत्याही शासकीय कार्यालयात अथवा निमशासकीय कार्यालयात यापुढे कोणताही कर्मचारी अधिकारी किंवा अभ्यागत म्हणजे कामानिमित्त जाणारे नागरिक बिना मास्क आढळल्यास जागेवरच दंड केला जाणार आहे. संबंधित कार्यालय प्रमुखांना हा दंड आकारण्याचे अधिकार देणारा आदेश नुकताच जारी झाला आहे.
या संदर्भातील शासकीय माहितीनुसार ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करणे तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत हा शासन आदेश काढला आहे.
राज्यात साथरोग प्रतिबंध अधिनियम, १८९७ व आपत्ती निवारण कायदा, २००५ ची अंमलबजावणी सुरु आहे. तथापि कोविड १९ प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन अंतर्गत लावण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत असतांना अर्थचक्रास चालना देण्यासाठी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. परंतु गर्दीव्यवस्थापन, शारीरिक अंतर पाळणे व मास्कचा वापर करण्यामध्ये नागरिकांकडून शिथिलता व निष्काळजीपणा झाल्याने राज्याला कोविड- १९ बाघेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला होता आणि त्यातूनच दुसऱ्या लाटेचे संकट उद्भवले होते. तसल्या लाटेची द्विरुक्ती टाळण्यासाठी आता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेश पारित केला आहे.
या आदेशात म्हटले आहे की, राज्यातील मंत्रालय, अधिनस्त कार्यालय, विधानभवनासह सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येण्याच्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णतः झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.
राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.
सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करून घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिका-याला नामनिर्देशित करतील.
सर्व कार्यालय व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणा-या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना संबंधित अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात, आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी) दंड करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.
सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणा-या अभ्यागत, कर्मचारी, अधिका-यांना दंड आकारणी करुन त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी सदर दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिका-याकडे जमा करेल व आहरण व संवितरण अधिकारी सदर दंडाची रक्कम खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षाखालील असलेल्या जमा सांकेतांकाखाली भरणा करेल.
हा दंड आकारलेला महसूल संबंधित अधिकाऱ्याने शासनाकडे जमा करायचा आहे.