नंदुरबार – शासनाची महात्वाकांक्षी मोहिम “शासन आपल्या दारी” च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जनकल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील या मोहिमेचे दैनंदिन सनियंत्रण व मुल्यमापन केले जाणार आहे व जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थ्यांना या मध्यमातून एकाच छताखाली लाभ देण्यात येणार आहेआहे; अशी माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली आहे.
कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जाते व त्या अनुषंगाने शासनस्तरावर जनकल्यणाच्या अनेक योजना आहेत. योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये विशिष्ट आर्थिक तरतूद केली जाते. लोककल्याणाचा दृष्टीकोणातून शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहाचविला जावा तसेच सर्व योजना एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात यावा या हेतूने राज्य शासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी विविध शासकीय योजनांच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्यासाठी शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी “शासन आपल्या दारी” हे अभियान १५ जून २०२३ पर्यंत राबविण्याचे शासनाने ठरविले आहे.
या अभियानांतर्गत नागरीकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचे लाभ दिले जाणार आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा जनकल्याण कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी श्री. कैलास देवरे, जिल्हा विशेष कार्यकारी अधिकारी यांची नंदुरबार जिल्ह्यासाठी जिल्हा समन्वयक म्हणून शासनातर्फे सदर योजनेसाठी नियुक्ती झाली आहे. जिल्हास्तरावर अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या प्रमुखांचा कक्ष गठित करण्यात आला असून या कक्षाचे सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी कळविले आहे.
हे असतील सदस्य
या कक्षात अपर पोलीस अधिक्षक, नंदुरबार, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि.प., जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) जि.प. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तहसिलदार (महसूल) जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती,नंदुरबार, सहाय्यक आयुक्त, नगर परिषद प्रशासन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, महा- आयटी, जिल्हा समन्वयक, महा-आयटी,जिल्हा व्यवस्थापक, सी. एस. सी. एस. पी. व्ही. यांचा या कक्षात सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
जनकल्याण कक्षाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या
या कक्षाच्या माध्यमातून “शासन आपल्या दारी” मोहमेसाठी काही दैनंदिन कर्तंव्ये व जबाबदाऱ्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी खत्री यांनी नमूद केले आहे, ते असे…
✅ जिल्ह्यातील सर्व विभाग व महामंडळे यांच्याशी दैनंदिन संपर्क करणे, गरजू शोध मोहिम, प्रचार व प्रसिद्धी, अर्ज नोंदणी, मंजूरी, कार्यक्रमाची पूर्ण तयारी करणे.
✅ मुख्यमंत्री सचिवालय व मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्याशी समन्वय ठेवणे.
✅ जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांची यादी तयार करणे.
✅ विविध विभागांच्या जिल्हा व तालुका प्रमुखांशी दिवसातून किमान दोन वेळा संपर्क करणे व त्यांची नोंद ठेवणे तसेच त्या विभागांना येणाऱ्या अडचणींची नोंद ठेवणे.
✅ दररोज जिल्ह्यातील विविध विभागांच्या किमान १० स्थानिक क्षेत्रीय कर्मचारी यांच्याशी संपर्क साधुन गावात व परिसरात या अभियानाची अंमलबजावणी कशी होत आहे, नागरीकांचा प्रतिसाद कसा आहे, काय अडचणी येत आहेत याचा आढावा घेणे व त्याची नोंद घेणे.
✅ जिल्ह्यातील विभागांकडून दैनंदिन आढावा घेणे.
✅ दररोज त्या विभागाकडून येणाऱ्या दैनंदिन आढावाची नोंद घेऊन त्यात काही सुधारण असतील तर त्या विभाग प्रमुखांशी तात्काळ संपर्क साधणे
✅ मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाला जिल्ह्याचा दैनंदिन अहवाल पाठविणे.
✅ या व्यतिरीक्त यंत्रणांशी समन्वय, प्रचार-प्रसिध्दी, कार्यक्रमाची तयारी, कार्यक्रम दिवशी लाभार्थी एकत्र करणे अशी विविध कामे जिल्हा जनकल्याण कक्षाने प्राधान्याने करावी.
✅ जिल्ह्यातील विविध पक्षाचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था व स्वयंसेवक यांच्याशी समन्वय साधणे.