शिकवण संतांची – संत नामदेव
वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संत कवी पैकी एक कवी म्हणजे संत नामदेव. संत नामदेवांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 साली हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी या गावात झाला. संत नामदेव हे विठ्ठलाचे परमभक्त होते अगदी लहानपणापासूनच ते श्रीविठ्ठलाचे निस्सीम भक्त होते व त्यांची भक्ती पाहून साक्षात विठ्ठलाने मानवीरूप धारण करून त्यांनी दिलेला नैवेद्य ग्रहण केला होता. संत नामदेवांच्या सांगण्यावरून त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन संत विसोबा खेचर यांच्याकडून उपदेश घेतला व त्यांना गुरु मानून त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. “सर्व सुख आहे मज पांडुरंगी” अशी नामदेवांची धारणा होती, त्यामुळे त्यांना तीर्थयात्रेत रस नव्हता. तरीही संत ज्ञानेश्वरांच्या इच्छेखातर ते त्यांच्याबरोबर तीर्थयात्रेला गेले तीर्थयात्रेहुन परत आल्यावर संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. संत नामदेवांनी तो प्रसंग पाहिला त्यावेळी ते 26 वर्षाचे होते, त्यानंतर त्यांनी आपले जीवन भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी वाहून घेतले. संत नामदेवांनी दीर्घ काळ उत्तर भारतात समाजजागृतीचे कार्य केले नंतर ते महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान ते पंजाब पर्यंत भागवत संप्रदायाचा प्रचार व प्रसार त्यांनी केला तो आपल्या कीर्तनाद्वारे त्यांनी समाजात प्रबोधन केले. राजस्थानमध्ये आजही त्यांची मंदिरे बघायला मिळतात त्या काळात समाजात कर्मकांडांचे स्तोम असताना संत नामदेवांनी भारतभ्रमण करून लोकांना भक्ती मार्ग दाखविला. संत रामानंद, कबीर व नानक अशा संतांनी संत नामदेवांपासून प्रेरणा घेऊन भक्तिमार्गाचा प्रसार केला. श्री गुरु ग्रंथसाहेब या शिख बान्धवांच्या धर्मग्रंथात संत नामदेवांनी 61 हिंदी पदे आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत. लोकांना कर्मकांडा यापासून परावृत्त करत नामस्मरणातून सुख, शांती व समाधान मिळविण्याचा सोपा मार्ग त्यांनी जनतेला दिला.
त्यांच्या अभंगातून ते म्हणतात,
हरि म्हणा हरि म्हणा अहो जन । आणिक बोलाल तरी विठ्ठलाची आण ॥१॥ अहिल्या पाषाण अजामेळ कुळहीन । उद्धरिला दर्शनें वाल्मिक जाण ॥२॥ नामयाचा विठा संतचरणीं ठेवोनि माथा । कीर्तनोंविण वृथा नको गोष्टी ॥३॥
संत नामदेव महाराज कळवळून सांगतात वाणीला, जिव्हेला हरिनामाचा छंद जडू द्या, हरी नामा शिवाय तुम्ही इतर कशाचाही उच्चार करू नका आणि त्यासाठी प्रेमपूर्वक ते आपल्याला विठ्ठलाची आण म्हणजे शपथ घालतात. एक प्रकारची ते मनाला सूचना देतात तू हरिनाम घे,समजा एकांतात असलो म्हणजे एकटे असलो तरीसुद्धा मनामध्ये अनेक प्रसंगांचे आवर्तन सुरू असतात,पुन्हा पुन्हा ते प्रसंग त्या व्यक्ती घटना मन:चक्षू पुढे फेर धरून नाचत असतात. अशावेळी आपल्या नकळत आपणही त्या मध्ये गुंतून जातो, भूतकाळ भविष्यकाळ हा खेळ चालू असतो कुठे भविष्यकाळातले चित्र असते कुठे भूतकाळातील प्रसंग असतात, या मध्ये मन वाणी बोलत असते बाह्यतः आपण शरीराने एकटे असलो तरी मनात हे सर्व भरून आहे म्हणून नामदेव महाराज हरी म्हणा हरी म्हणा असे सांगतात.काया वाचा मनाने हरिनामाचाचे संकीर्तन केल्याने अहिल्येचा उद्धार झाला अजामेळ उध्दरला वाल्याचा वाल्मिकी झाला, ही उदाहरणं आपल्या सर्वांना ठाऊक आहे. विठ्ठलाचे चरणचं ज्याचे सर्वस्व आहे असे नामदेव पुन्हा पुन्हा सांगतात कीर्तना शिवाय म्हणजे हरिनाम गुणसंकीर्तन शिवाय इतर गोष्टी बोलणे म्हणजे ती वृथा बडबड आहे आणि ती तुम्ही करू नका! हरी नाम घ्या हरिनाम घ्या आणि स्वतःचा उद्धार करा. अश्या हरिनामाची गोडी लावत भक्तिमार्गाची शिकवण देऊन शांती व समाधान देणाऱ्या संत नामदेव महाराजांना त्यांच्या जयंती नीमित्त शतशः प्रणाम.
– डॉ० पी. एस. महाजन
संभाजीनगर