नंदुरबार :- नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे ऑक्टोबर पेड नोव्हेंबर या महिन्याचे वेतन व दिवाळी सण अग्रीम नोव्हेंबरच्या दुसऱ्या दिवशी जमा झाल्याने शिक्षक वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून नंदूरबार जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे जीवन वेतन तब्बल महिना संपल्यानंतर जमा केले जात होते. याबाबत जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी वेळोवेळी आवाज उठवला. मात्र, जीवन वेतन करणाऱ्या यंत्रणेवर कुठलाही परिणाम झाला नाही. अखेर पंचायतराज समितीसमोर शिक्षक संघटनांनी वेतनाबाबतची आपली व्यथा मांडली आणि जिल्हा परिषद प्रशासनाने वेतनासाठी स्वतंत्र समन्वयक म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण यांची नियुक्ती केली. वेतानासंबंधीच्या सर्व त्रुटींचा अभ्यास करून डॉ. पठाण यांनी शासनाच्या निर्देशानुसार पाच तारखेच्या आत वेतन देण्यासाठी नियोजन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा फडोळ, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. राहुल चौधरी, लेखा व वित्त अधिकारी श्री अतुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अवघ्या दोन तारखेला जिल्हाभरातील शिक्षकांचे जीवन वेतन व दिवाळी अग्रीम अदा करण्यात आले. ऑक्टोबर महिन्याचे थकीत वेतन 28 ऑक्टोबर रोजी अदा झाल्यानंतर अवघ्या चारच दिवसात दुसरे वेतन जमा झाल्याने शिक्षक वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात आले. सर्व शिक्षक संघटनांनी जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार व्यक्त करत संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले, यापुढेही जीवनवेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आला.

